केंद्राचे राज्यातील पहिले प्रिंटिंग क्‍लस्टर औरंगाबादेत

आदित्य वाघमारे
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - प्रिंटिंग क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान औरंगाबादेत उपलब्ध होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "औरंगाबाद प्रिंटिंग क्‍लस्टर'ला मूर्त रूप येऊ घातले आहे. केंद्राच्या मदतीने तब्ब्ल साडेसोळा कोटींचे हे राज्यातील पहिले प्रिंटिंग क्‍लस्टर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उभे राहणार आहे. या माध्यमातून 150 थेट, तर चार हजार अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

शहरातील 300 पैकी 27 सदस्यांनी एकत्र येत प्रिंटिंग क्‍लस्टर स्थापन केले असून अव्वल दर्जाचे काम करण्यासाठी "स्टेट ऑफ आर्ट' दर्जा असलेली यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. या क्‍लस्टरसाठी दोन एकरातील इमारतीच्या बांधकामासाठीची 1 कोटी 65 लाखांची निविदा 17 मे रोजी प्रसिद्ध झाली असून, त्याची प्री-बीड बैठक उद्योग सहसंचालक कार्यालयात सोमवारी (ता. 21) झाली. या ठिकाणी सुमारे बारा कोटींची यंत्रसामग्री मार्च 2019 पर्यंत कार्यान्वित होणार आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रिंटिंग उद्योगांसाठी येथे मोठी सेंट्रल फॅसिलिटी सेंटर उभे राहणार असून त्यात 24,000 चौरस फुटांचा यांत्रिकी विभाग, तर 5,000 चौरस फुटांवर प्रशासकीय विभाग काम करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 12.5 कोटी, तर राज्य सरकारे 1.5 कोटींचा निधी यासाठी दिला आहे. वास्तुविशारद महेश कुलकर्णी यांनी क्‍लस्टरचा आराखडा तयार केला आहे.

एमआयडीसीकडून 2 एकर जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) या प्रकल्पासाठी दोन एकरचा भूखंड चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील प्रिंटिंग उद्योजकांना शहरालगतच हे क्‍लस्टर उभारता यावे यासाठी हा प्लॉट देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील लहान प्रिंटिंग व्यावसायिकांना महागड्या यंत्रांवर काम करता येणार आहे.

तंत्रज्ञान माहिती असलेल्या; पण यंत्रणा खरेदी न करू शकणाऱ्या उद्योजकांसाठी हे सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- अनिल अर्डक, औरंगाबाद प्रिंटिंग क्‍लस्टर

Web Title: printing cluster building in aurangabad