खासगी क्‍लासेसवर कायद्याने बंधने आणा - आमदार अमित देशमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

लातूर - ‘स्टेप बाय स्टेप क्‍लासेस’चे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून झाला, ही घटना दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष दिले असते तर ती घटना टाळता आली असती. या घटनेमुळे ‘लातूर पॅटर्न’ला धक्का बसला आहे. खासगी क्‍लासेसच्या संचालकांचा वावर पाहिला तर धास्ती बसावी असा आहे. हे लातूरकरांसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे क्‍लासेसवर कायद्याची बंधने असावीत. हा व्यवसाय कायदेशीर चालावा यासाठी काँग्रेस आंदोलन करेल. विधिमंडळातही हा प्रश्‍न उपस्थित करू, असे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले.

येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘खुनाच्या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या क्षेत्रात सध्याचे चित्र वाईट आहे. शस्त्रधारी प्राध्यापक असतील तर यातून काय बोध घ्यायचा? दक्षता समित्या काय करीत आहेत? अन्य गुन्हेगारीचा विचार केला तर गेल्या काही महिन्यांत १३ खून, २० खुनाचे प्रयत्न, १६ बलात्कार, सहा दरोडे, २३० चोरीच्या घटना घडल्या आहेत. वाढती गुन्हेगारी पाहता पोलिस दल कोणाच्या सूचनांवर काम करीत आहे? लातूरपासून ते नागपूरपर्यंत गुन्हेगारी वाढत आहे. लातूरमध्ये काय घडत आहे याची मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे का?’

खुनाच्या घटनेमुळे लातूर पॅटर्नला धक्का बसला आहे. घटना उघडकीस आणणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. पण ते दक्ष राहिले असते तर ती घटना टाळता आली असती. या घटनेतून सावरणे सोपे नाही. व्यावसायिक, जिवाच्या सुरक्षेसाठी ‘प्रोटेक्‍शन मनी’चा प्रकार पुढे येत आहे. पोलिसांवरचा विश्वास उडत चालला आहे. क्‍लासेसमध्ये पैसा असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यात येत आहेत. याला प्रतिबंध घालण्याची गरज आहे.

क्‍लासेसमध्ये किती विद्यार्थी असावेत, काय सुविधा असाव्यात, यासह अन्य बाबींसाठी कायदेशीर बंधने असायला हवीत. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे देशमुख म्हणाले. 

मोईज शेख, ॲड. दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, प्रा. स्मिता खानापुरे, ख्वाजाबानू अन्सारी आदी उपस्थित होते.

लातुरात हप्तेखोरी सुरू
मराठवाड्यात एकमेव लातूर जिल्ह्यात साडेआठ हजार रुपये ब्रास या दराने वाळू विकली जात आहे. यात सामान्य नागरिक अडचणीत आला आहे. जिल्ह्यात हप्तेखोरी सुरू असून याचा शासनाने शोध घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नाही. हे सर्व जाणून-बुजून सुरू आहे. हे लोक पाहत आहेत. निवडणुकीत लोकच उत्तर देतील, असे आमदार देशमुख म्हणाले.

Web Title: private class law binding amit deshmukh