कापूस खरेदीमध्ये खासगी व्यापारी आघाडीवर

file photo
file photo

परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या हंगामात पणन महासंघ, सीसीआय आणि खासगी व्यापारी यांनी आतापर्यंत दहा लाख ५४ हजार ३५८ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. कापसाच्या खरेदीमध्ये खासगी व्यापारी आघाडीवर आहेत. अजूनही कापसाची आवक सुरू असल्याने खरेदीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

गतवर्षी खरीप हंगामात लागवड केलेल्या कापसाची आवक नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस काळवंडला होता. जो कापूस वेचणीला आला होता, तो भिजल्याने प्रतवारी खराब झाली होती. तसेच नव्या बोंडांनादेखील फटका बसला होता. त्यामुळे सुरवातीचे एक ते दोन वेचण्या पूर्णपणे खराब कापूस आला होता. त्यानंतर लागलेल्या पाना-फुलांनी कापूस  बहरून उत्पादन सुरू झाले. जानेवारी महिन्यात कापसाची पुन्हा आवक वाढली. कापसाच्या खरेदीसाठी शासनाने कापूस पणन महासंघ, सीसीआय यांच्या मदतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.

पणन महासंघाची खरेदी
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाची परभणी, गंगाखेड, पाथरी तालुक्यात 
दहा खरेदी केंद्र आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत दोन लाख ५३ हजार ६२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यामध्ये परभणीतील श्री गणेश केंद्रावर २१ हजार ८२२.३५, दुर्गेश्वरी केंद्रात १४ हजार ६८३.६०, महेश जिनिंगमध्ये २८ हजार ८१.९०, बाभळगाव अग्रवाल केंद्रात १८ हजार ११९.५५, एनसीसी नृसिंह पाथरी केंद्रावर २३ हजार ३०६.२०, गंगाखेड केंद्रावर ४९ हजार ४२७.८०, केशव केंद्रात ४१ हजार ११६.८५, प्रसाद केंद्रात २५ हजार १८४.०५, व्यंकटेश केंद्रात एक हजार ५२९.२०, बजरंग केंद्रात दोन हजार ७८१.१५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर हिंगोली येथील एका केंद्रावर २९ हजार ३०६.८० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

सीसीआयची खरेदी
भारतीय कापूस निगम महामंडळ, अर्थात सीसीआयच्या परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, पूर्णा, ताडकळस, जिंतूर, सोनपेठ या पाच केंद्रांतर्गत दोन लाख ९२ हजार ४२० क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर, जवळाबाजार या केंद्रांवर ७४ हजार ९७४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये सेलू केंद्रावर ६९ हजार ७८४ क्विंटल, मानवत केंद्रावर एक लाख दहा हजार ६५ क्विंटल, पूर्णा केंद्रावर ११ हजार ८३३ क्विंटल, ताडकळस केंद्रावर ४० हजार ५८२ क्विंटल, जिंतूर केंद्रावर ५१ हजार ८५४ क्लिटंल, करम (सोनपेठ) केंद्रावर आठ हजार ३०२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. हयातनगर (वसमत) केंद्रावर ४४ हजार ७१७ क्विंटल, जवळाबाजार (औंढा) केंद्रावर ३० हजार २५७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाजार समित्यांतर्गत खासगी व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी बाजार समितींतर्गत चार लाख ३३ हजार ३४१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. त्यासाठी कापसाची प्रतवारी पाहून चार  हजार ७०० रुपये ते पाच हजार २०० रुपये एवढ्या दराने कापसाची खरेदी केली आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्यांनी चार लाख २३ हजार ४१५ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यात नऊ हजार ९२६ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. परभणी जिल्ह्यात नऊ लाख ४० हजार १५१.२५ क्विंटल, तर हिंगोली जिल्ह्यात एक लाख १४ हजार २०६.८० क्विंटल, अशी एकूण एक लाख ५४ हजार ३५८.०५ क्विंटल  कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com