दोन इंची नळ असूनही खासगी टॅंकरचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

औरंगाबाद - मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी दोन इंची नळाची जोडणी घेण्यात आलेली आहे. मिनी मंत्रालयाला दररोज १० ते १२ हजार लिटर पाण्याची गरज आहे; मात्र नळाला चार दिवसांत फक्‍त पाच हजार लिटर पाणी मिळते. पाण्याची गरज भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला टॅंकरवरच अवलंबून राहावे लागते. महिन्याला टॅंकरच्या बिलापोटी ३० हजार म्हणजे वर्षाला ३ लाख ६६ हजार रुपये खर्च करावे लागतात. एवढे करूनही कर्मचाऱ्यांना पाणी मात्र घरूनच बाटल्या भरून आणावे लागते, ही शोकांतिका आहे. 

जिल्हा परिषदेत पिण्याच्या पाण्याची एकीकडे बोंब, तर वापराच्या पाण्याची त्याहूनही वाईट अवस्था आहे. खुद्द सभापतींच्या दालनामधील स्वच्छतागृहात पाणी नाही, मग या कार्यालयातील इतर स्वच्छतागृहांमधील पाण्याच्या व्यवस्थेबद्दल न बोललेलेच बरे! जिल्हा परिषदेत महापालिकेकडून दोन इंची नळाचे कनेक्‍शन घेण्यात आले आहे, याला चार दिवसांत एकदा पाणी येते तेही पुरेसे नसते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरात तीन विंधनविहिरी आहेत; मात्र आता उन्हामुळे त्यांचेही पाणी आटले आहे. यासाठी दिवसाआड १२ हजार लिटर पाणी टॅंकरने विकत घेण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. साधारण महिन्याला २० टॅंकर मागवावे लागतात, प्रतिटॅंकर दीड हजार रुपयांप्रमाणे महिन्याला ३० हजार याप्रमाणे वर्षाला ३ लाख ६६ हजार रुपये नुसत्या टॅंकरच्या बिलावर खर्च करावे लागतात.

मालकीचे टॅंकर धूळखात
जिल्हा परिषदेच्या मालकीचे टॅंकर दिल्ली गेट येथे गेल्या कित्येक दिवसांपासून जागेवर उभे आहे. हे टॅंकर दुरुस्त केले तर जिल्हा परिषदेचा पाण्यावर होणारा निष्कारण खर्च वाचू शकतो; परंतु या टॅंकरची बिले काढता येणार नाहीत यासाठी प्रशासन स्वत:च्या मालकीचे टॅंकर दुरुस्त करून त्याचा वापर करून घेण्यास उत्सुक नाही.

Web Title: private water tanker water supply