सफाई खासगीकरणाचा पुन्हा हुकला मुहूर्त 

Aurangabad_Municipal
Aurangabad_Municipal

औरंगाबाद - शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतुकीचे काम महापालिकेने बंगळूर येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. काम सुरू करण्यासाठी कंपनीला वारंवार डेडलाइन देण्यात आल्या. 26 जानेवारीपासून काम सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार वाहनांचे पूजनही करण्यात आले. मात्र रविवारी (ता. 27) कंपनीची एकही गाडी रस्त्यावर दिसून आली नाही. आता फेब्रुवारी महिन्यापासून काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी प्रकल्प उभारणे व कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंगळूर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले. त्यानुसार गेल्या आठवड्यात शनिवारी (ता. 12) करारही अंतिम करण्यात आला. महापालिका या कंपनीला प्रतिटन 1,863 रुपये दराने पैसे देणार आहे. काम सुरू करण्यासाठी कंपनीला वारंवार आवाहन करण्यात आले; मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. 26 जानेवारीला कंपनीच्या वाहनांचे पूजनही करण्यात आले. यावेळी रविवारपासून (ता. 27) कंपनी कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाला सुरवात करणार असे सांगण्यात आले; मात्र मनुष्यबळाची अडचण, काही वाहनांची खरेदी अद्याप बाकी आहे. शिवाय, जी वाहने उपलब्ध केली आहेत, त्यांची पासिंग झालेली नाही. त्यामुळे काम सुरू करणे शक्‍य नाही. सर्व तांत्रिक अडचणी सोडवून मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी अजून आठवडाभराचा अवधी लागणार आहे, असे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे. 
  
बचतगटावरून कंत्राटदारावर दबाव 
कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर बचतगटांमार्फत महापालिकेत काम करणाऱ्या कामगारांवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे हे कर्मचारी कंत्राटदारांनी घ्यावेत यासाठी काही संघटना दबाव टाकत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेने रॅमकी या कंपनीला साफसफाईचे काम दिले होते. त्यावेळी महापालिकेचे कर्मचारी रॅमकीने घेतले मात्र त्यांचे वेतन परवडत नसल्याने शेवटी कंपनीने काम बंद केले. हा अनुभव पाहता यावेळी कंत्राटदाराला कर्मचारी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com