कौशल्य विकास कार्यक्रमातून हर्सुल कारागृहात होणार सॅनिटरी पॅडची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहाकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी सांगितले. 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहाकरिता सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी कारागृह अधिक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरूंग अधिकारी आशिष गोसावी, महिला तुरूंग अधिकारी मेधा वाहेकर, सरपंच मंगलाताई वाहेगावकर, कारागृह शिक्षक एस. जी. गिते, पंचशिला चव्हाण, महिला रक्षक कल्पना जगताप, रेखा गडवे आदीसह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना राहटकर म्हणाल्या की, राज्यातील 9 महिला कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांकरिता सॅनिटरी  पॅड वेंडिंग मशीन तसेच वापर झालेले पॅड जैविकरित्या नष्ट करण्याकरिता बर्निंग मशीन देण्यात येत आहे. कारागृहातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी राज्य महिला आयोगाकडून आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहे. शिक्षा पूर्ण केलेल्या महिलांना परत सर्वसामान्य आयुष्य जगता यावे, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार-स्वयंरोजागाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हर्सुल कारागृहातील महिलांना लवकरच गरम पाण्यासाठी गिझर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वेंडिंग मशीन कारागृहात देताना सोबत 50 नॅपकिन आयोगामार्फत देण्यात येत आहेत. त्यानंतर वेंडिंग मशीन आणि बर्निंग मशीनची सुरक्षा व  देखभाल करणे, वेळोवेळी मशीनमध्ये सॅनिटरी पॅड भरणा करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधणे याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असणार आहे. तसेच सॅनिटरी पॅड मोफत देणे किंवा अत्यल्प दरात देण्याबाबतचा निर्णय संबंधित कारागृह प्रशासनाचा असणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Production of sanitary pad in Hersul Jail from Skilled Development Program