मोसंबी करतेय शेतकऱ्यांना मालामाल 

तुकाराम शिंदे 
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

तीर्थपुरी (जि. जालना) : सध्या टनासाठी पन्नास हजारांवर भाव 

तीर्थपुरी (जि. जालना) -  गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. गतवर्षीही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन कमी होत आहे. उत्पादन कमी होत असल्याने मोसंबीला चांगला भाव मिळत आहे. आतापर्यंत सर्वाधिक 50 हजार रुपये प्रतिटनावर भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी मालामाल होत आहेत. 

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात विशेषतः अंबड-घनसावंगी तालुक्‍यांत मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. हे दोन्ही तालुके मोसंबीचे आगर म्हणून ओळखले जातात; परंतु वर्ष 2012 च्या दुष्काळात हा आगर धोक्‍यात आला. दुष्काळनंतर शेतकऱ्यांनी पुन्हा सावरून मोसंबीची लागवड केली. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी आंबिया बहराचे नियोजन केले; परंतु पुन्हा दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आला. अनेक मोसंबीच्या बाग बहरात आल्या असतानाच पाणी कमी पडू लागले. त्यामुळे अनेकांना बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. काही शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन बाग जतन करून आंबिया बहार धरला. गतवर्षीच्या दुष्काळामुळे मोसंबीचे उत्पादन कमी प्रमाणात झाल्याने मोसंबीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांनी आतापर्यंत या भागातून प्रतिटन 30 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये टनापर्यंत भाव मिळत आहे. दिवाळीनंतर मोसबीला आणखीन मोठ्या प्रमाणात भाव मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

उत्पादन कमी, भाव जास्त 
सततच्या दुष्काळामुळे अनेकांच्या फळबागा नामशेष झाल्या. परिणामी या भागात यंदा मोसंबीचे उत्पादन कमी झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी आणून कशाबशा फळबागा जगविल्या. आता यंदा उत्पादन कमी असतानाही चांगला भाव मिळाल्याने या बागेपासून चांगले पैसे झाले आहेत. 

मोसंबीची लागवड वाढणार 
घनसावंगी तालुक्‍यातील तीर्थपुरी येथे जवळपास सातशे एकरवर मोसंबीची लागवड असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून मोसंबीला चांगला भाव मिळत असल्याने मोसंबीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन होत आहे. त्यामुळे यापुढील काळात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. 

तीर्थपुरी व परिसरात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात असून, गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन आंबिया बहराचे नियोजन केले. बाजारपेठेत मोसंबीची आवक कमी येत असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत आहे. या भागात आतापर्यंत 50 हजार रुपये प्रतिटनावर भाव यंदा शेतकऱ्यांना मिळाला असून, दिवाळीनंतर आणखी भाव वाढणार असल्याचे बोलले जात आहे. 
-गणेश बोबडे, मोसंबी उत्पादक 
----- 
शेतात पूर्वी पारंपरिक पिके घेत होतो. गेल्या पाच वर्षांपूर्वी दोन एकरांत मोसंबीची लागवड केली. गेल्यावर्षी या मोसंबीपासून चांगले उत्पादन मिळाले. यंदाही या बागेपासून चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. 
- आबासाहेब बोबडे, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: profit in Sweet lemon