प्रतीकात्मक तूर जाळून शेतकऱ्यांनी केला निषेध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जळकोट - नाफेडच्या वतीने जळकोट बाजार समितीला तूर खरेदी बंद करण्याचे आदेश आल्याने तालुक्‍यातील तीनशे शेतकऱ्यांची सहा हजार क्विंटल तूर अद्यापही पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.24) शासनाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक तूर जाळून बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले. 

जळकोट - नाफेडच्या वतीने जळकोट बाजार समितीला तूर खरेदी बंद करण्याचे आदेश आल्याने तालुक्‍यातील तीनशे शेतकऱ्यांची सहा हजार क्विंटल तूर अद्यापही पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.24) शासनाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक तूर जाळून बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले. 

तालुक्‍यात तूर खरेदी करण्यासाठी तीन महिन्यांपासून केंद्र सुरू केले होते. शेजारचा नांदेड जिल्हा व उदगीर येथील शेतकऱ्यांनीही येथे मोठ्या प्रमाणात तूर आणली होती. बारदाना वेळेवर मिळत नसल्याने तुरीचा काटा वेळेवर होऊ शकला नाही. मध्यंतरी सहा दिवस काटा बंद पडला होता. तुरीची आवक बाजार समितीच्या आवारात पडून होती. काही दिवसांपूर्वी नाफेडने मुदतवाढ दिल्याने तुरीचा काटा पुन्हा सुरू झाला. त्यामुळे संपूर्ण तुरीचे वजन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली होती; परंतु अचानक तुरीचे केंद्र बंद करण्याचे आदेश ता.22 रोजी आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सहा हजार क्विंटल तूर पडून असल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.24) जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली तुरीवर रॉकेल टाकून पेटवून देऊन आंदोलन केले. तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर असून खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे. बाजार समितीच्या आवारात तीनशे शेतकऱ्यांची सहा हजार क्विंटल तूर पडून असून बाजार समितीने या शेतकऱ्यांना टोकन दिले आहेत. शेतकरी आता तळपळत्या उन्हात आपल्या तुरीची राखण करीत आहेत. 

""शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अन्यथा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.'' 
-संतोष तिडके, गटनेता जिल्हा परिषद, लातूर 

""एक महिन्यापासून तूर खरेदी केंद्रावर आणलेली आहे. शासनाने अचानक खरेदी केंद्र बंद केल्याने एक महिन्यापासून कामधंदा सोडून बसलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.'' 
- प्रभाकर आनकाडे, शेतकरी 

Web Title: Prohibition of farmers by burning symbolic tur