नामवंत मल्लांनी गाजविले कुस्तीचे मैदान

सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाचे निमित्त; ८५ मल्लांचा सहभाग, दोघांची कुस्ती बरोबरीत
नामवंत मल्लांनी गाजविले कुस्तीचे मैदान
नामवंत मल्लांनी गाजविले कुस्तीचे मैदानsakal

उमरगा : महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या कसगीच्या बेन्नीतुरा नदीच्या काठावरील श्री. सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त रविवारी (ता.१३) आयोजित कुस्तीच्या फडात महाराष्ट्र- कर्नाटकातील अनेक मल्लांनी आपल्या कौशल्याने कुस्तीची रंगत वाढविली. दरम्यान, शेवटची दहा हजार रक्कमेची कुस्ती आळंद (कर्नाटक) येथील सिध्दू बेळंमगी आणि रामलिंगमुदगडचा (ता. निलंगा) भैय्या माळी यांच्यात झाली. दोन्ही मल्ल तितक्याच ताकदीचे असल्याने कुस्ती निकालात लागत नसल्याने शेवटी बरोबरीत काढण्यात आली.

कुस्ती स्पर्धेचे उद्‍घाटन युवा नेते किरण गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक समाधान कवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच बबिता कांबळे, माजी सरपंच फुलचंद भोसले, प्रा. विठ्ठलराव जाधव, उपसरपंच हणमंत गुरव, अमरसिंह राजपूत, गोविंद पुरी महाराज, धनराज शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव शहापूरे, व्यंकट पाटील, शरद पवार, शब्बीर सरनोबत, रणजित ठाकूर, ग्रामविकास अधिकारी श्री. देशमुख, श्री. कलशेट्टी, श्री. लोखंडे आदींची उपस्थिती होती.

उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर जिल्ह्यातील अनेक मल्लांनी कुस्तीच्या डावपेचाची कसरत दाखविली. रामलिंग मुदगडच्या पवन गोरे यांनी कुन्हाळी सत्यप्रकाश नरवटे याला चीत करून कुस्ती जिंकली. बेळंबचा वसीम बेळंबी, होर्टीचा क्रांती भोसले, नळदुर्गचा मुजम सय्यद, सोलापूरचा दिगंबर जगताप यांनी कुस्ती जिंकली. उमरग्याच्या अमर मसरे या युवा मल्लाने अक्रम शेखचा पराभव केला.

विविध भागातून आलेल्या ८५ मल्लांनी फडात कुस्तीची रंगतदार चमक दाखवत विजय मिळविला. यात्रा समिती व ग्रामपंचायतीने बक्षिसासाठी एक लाखाची रक्कम खर्च केली. कुस्तीसाठी लावलेल्या एकूण रक्कमेपैकी विजेत्या मल्लांना ७० टक्के तर उपविजेत्या मल्लाला ३० टक्के रक्कम यात्रा समितीने दिली. शेवटच्या कुस्तीची दहा हजाराची रक्कम गणेशपुरी चंचलगिरी गोसावी यांच्यातर्फे देण्यात आली.

पंच म्हणून मकबूल सरनोबत, विजयकुमार माशाळे, मल्लीनाथ बोरूटे, नारायण नवले, केशव मदने, हरिसिंग राजपूत, आप्पाराव जाधव यांनी काम पाहिले. वाकडी (ता. परंडा) येथील राजाभाऊ देवकते यांनी कुस्तीचे उत्कृष्ट समालोचन केले.

मंतजीर सरनौबतला ‘आगे बढो’च्या सद्भावना

कसगीचा भूमिपुत्र, तरुण मल्ल मंतजीर सरनौबत याच्या कुस्तीचे डावपेच उपस्थितांना पाहता आले नाहीत. आठ महिन्यांपूर्वी कुस्ती खेळताना गुडघ्याला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तो नेहमीप्रमाणे लातूरच्या काका पवार यांच्या पुण्यातील तालमीत सराव करतोय. तो कसगीच्या फडात उपस्थित होता. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी त्याला ‘आगे बढो’ अशा सद्भावना व्यक्त केल्या.

सख्या बहिणींची लक्षवेधक कुस्ती

अक्कलकोट तालुक्यातील सदलापूरच्या धरती बनसोडे आणि सावित्री बनसोडे या सख्या बहिणी कुस्तीचे फड गाजवत आहेत. मर्दांगी खेळात ग्रामीण भागातील मुलींची पकड सर्वांचे लक्ष वेधत होते. अनेकांनी त्यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com