हे तर हिंदू राष्ट्राचे प्रमोशन - प्रा. विजय दिवाण 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद - घटनेच्या तत्त्वांविरोधात हिंदू राष्ट्राचे प्रमोशन सुरू असून संविधानाला तडा देणारी ही राजवट आहे. माझा जन्म इथला असेल तर नागरिकत्व सिद्ध करायला लावणारे "हे' कोण? असा परखड सवाल पर्यावरणतज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी सरकारला केला. तसेच स्वातंत्र्यापासून जपलेल्या एकतेवरच घाला घातला जात असून, त्यालाच "राष्ट्रवाद' म्हटले जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

बापू-सुधा काळदाते प्रतिष्ठानतर्फे शनिवारी (ता. 21) जेएनईसीच्या आइन्स्टाइन सभागृहात बापूसाहेब काळदाते राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी प्रा. दिवाण यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अंकुश भालेकर होते. 

प्रा. दिवाण म्हणाले, की राष्ट्रवादाच्या कल्पनेमध्ये लोकशाही, समतावादी, धर्मनिरपेक्ष यांचा समावेश आहे. लहानपणी तिरंगा झेंडा कुणाचा? 40 कोटींच्या देशाचा अशा घोषणा देत असत. आता लोकसंख्या 140 कोटींवर पोचली असली तरी वाढलेले सर्व हिंदू आहेत का? याचे भविष्यात काय दुष्परिणाम होतील, हे जाणून घेत त्याविरोधात उभे राहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. 

प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन झाले. स्पर्धेचे उद्‌घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, की बापूसाहेबांनी अभ्यासपूर्ण वक्‍तृत्वाच्या जोरावर विधानसभेपासून ते संसदेपर्यंत कायम लक्षात राहील, अशी आपली वेगळी शैली दाखवून दिली. तरुणांनीदेखील विषयांची मांडणी करण्यापूर्वी अभ्यास केला पाहिजे. त्यावर तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे, हे जाणून घेतल्यानंतर आपले स्वतंत्र मत तयार करून लोकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी वक्‍तृत्वाचा आधार घ्यावा. "राष्ट्रवाद : समज आणि गैरसमज', "अर्थव्यवस्थेची घसरण आणि वाढती बेरोजगारी' आणि "समकालीन शैक्षणिक वाटचालीची दिशा' या विषयांवर स्पर्धकांनी मते मांडली. 

सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब खंदारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. परीक्षक म्हणून ओमप्रकाश कलमे, प्रज्ञा जाधव, प्रा. आनंद उबाळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संयोजक डॉ. अपर्णा कोत्तापल्ले यांनी केले. प्रा. संतोष भोसले यांनी विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. आभार बंडू सोमवंशी यांनी मानले. 
ऍड. सुनील काळदाते, सुलभा खंदारे, डॉ. राम चव्हाण उपस्थित होते. 
-- 
हे आहेत विजेते
स्पर्धेत डॉ. कांचन देसरडा महाविद्यालयाचा हर्षद औटे याने प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंपर्क व पत्रकारिता विभागाचा विद्यार्थी रोहित गिरी याने द्वितीय, तर माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातील कल्याणी काकडे व एमआयटी पुणे येथील वैष्णवी भालशंकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com