राज्यात मोठ्या खरेदी-विक्रीला ब्रेक

शेखलाल शेख
बुधवार, 14 डिसेंबर 2016

स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क व्यवहार 50 टक्‍क्‍यांनी थंडावले
1) राज्यात या महिन्यात नोंदणी केलेले दस्त 48,823
2) राज्यभरात वर्षात नोंदणी केलेले दस्तावेज - 14,51,762
3) नोटाबंदीनंतर या महिन्यात जमा महसूल - 472.09 कोटी
4) चालू आर्थिक वर्षात जमा महसूल - 11050.06 कोटी
5) औरंगाबादेत नोव्हेंबर महिन्यात दस्तनोंदणी - 6 हजार 500
6) औरंगाबादेत नोव्हेंबर महिन्यातील महसूल - 20.50 कोटी

स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क व्यवहार 50 टक्‍क्‍यांनी थंडावले
1) राज्यात या महिन्यात नोंदणी केलेले दस्त 48,823
2) राज्यभरात वर्षात नोंदणी केलेले दस्तावेज - 14,51,762
3) नोटाबंदीनंतर या महिन्यात जमा महसूल - 472.09 कोटी
4) चालू आर्थिक वर्षात जमा महसूल - 11050.06 कोटी
5) औरंगाबादेत नोव्हेंबर महिन्यात दस्तनोंदणी - 6 हजार 500
6) औरंगाबादेत नोव्हेंबर महिन्यातील महसूल - 20.50 कोटी

औरंगाबाद - जुन्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटाबंदीने राज्यभरात मोठ्या खरेदी-विक्री दस्तनोंदणी व्यवहाराला मोठा ब्रेक लागला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्तनोंदणीत तब्बल पन्नास टक्‍क्‍यांची घट झाली. सध्या खरेदी-विक्री, इसार पावती, भाडे करारनामा यासारखे किरकोळ व्यवहार होत आहेत.

स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, गहाणखत, इसार पावती, भाडे करारनामा, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामकाजाकरिता वर्षाकाठी साधारणपणे दोन कोटी नागरिक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांना भेट देतात. मात्र, नोटाबंदीचा फटका या विभागाला बसला असून स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, मुद्रांक शुल्क भरणामध्ये घट झाल्याने कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात व्यवहार अर्ध्यावर
मराठवाड्यात अगोदरच दुष्काळी स्थितीने खरेदी व्यवहारावर परिणाम होत होते. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने मोठी खरेदी-विक्री जास्त होईल असा अंदाज बांधला जात असताना नोटाबंदीने यावर पाणी फेरले गेले आहे. लोकांकडे पैसा असला तरी त्यांनी आता काही महिन्यांकरिता खरेदी-विक्रीचा प्लॅन बदलला आहे. सध्या मोठ्या जमिनी, प्लॉटला खरेदीदार मिळेनासा झाल्याने कुणीही हा व्यवहार तोट्यात करण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्ह्यात फक्त किरकोळ व्यवहारच होताना दिसतात. औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी व मुद्रांक कार्यालयात ऑक्‍टोबर महिन्यात 10 हजार 434 दस्तनोंदणी झाली त्यातून 33 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. नोटाबंदीनंतर यामध्ये कमालीची घट झाली असून नोव्हेंबरमध्ये फक्त 6 हजार 500 दस्तनोंदणी झाली त्यातून फक्त 20.50 कोटी रुपयांचाच महसूल मिळाला. म्हणजेच यामध्ये जवळपास साडेबारा कोटी रुपयांची घट झाली.

विक्रीकर विभागाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विभाग
राज्याच्या महसुलात नोंदणी व मुद्रांक विभागाचा वाटा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. मुद्रांक शुल्क दराचे वेळोवेळी करण्यात आलेले सुसूत्रीकरण आणि बाजार मूल्य संकल्पनेची व त्यासाठीच्या वार्षिक मूल्य दर तक्‍त्यांच्या अंमलबजावणीद्वारे महसुलाचा आलेख उंचावत गेला. आजमितीस नोंदणी व मुद्रांक विभाग राज्यात महसूल संकलनाच्या बाबतीत विक्रीकर विभागाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नोटाबंदीने या विभागाला फटका सहन करावा लागला आहे.

नोटाबंदीनंतर खरेदी व्यवहारात घट
नोंदणी व मुद्रांक विभागात या महिन्यात राज्यात 48,823 दस्त नोंदणी करण्यात आले. त्यातून याच महिन्यात फक्त 472.09 कोटी रुपयांचाच महसूल मिळाला. तर आत्तापर्यंत या आर्थिक वर्षात राज्यात 14,51,762 दस्तऐवज नोंदणी झाले. त्यातून चालू आर्थिक वर्षात 11,050.06 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. महिन्याला हजारो कोटींच्या घरात असणारा महसूल नोटाबंदीने पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झाला.

खरेदी-विक्री व्यवहाराला ब्लॅक आणि व्हाईटची किनार
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा मुद्रांक कार्यालयाच्या तीन विभागांत दररोज किमान 20 ते 30 मालमत्तांची खरेदी-विक्री दस्तनोंदणी होते. परंतु व्यवहारातून नोटा बंद करण्यात आल्यामुळे दस्तनोंदणीचे व्यवहार मोठा परिणाम झाला आहे. जास्तीत फक्त गहाणखत, इसार पावती, भाडे करारनामा, किरकोळ खरेदी-विक्री व्यवहार होतात. मोठ्या मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहाराला ब्लॅक आणि व्हाईटची किनार असते. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार कागदोपत्री ठरल्यानुसार त्याचे रजिस्ट्री शुल्क भरण्यात येते आणि उर्वरित ठरलेली रक्कम ही संबंधितांना ब्लॅक मनी म्हणून दिली जाते. अशा व्यवहारात हजार, पाचशेच्या नोटांचा अधिक व्यवहार होतो. परंतु नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्यवहार अर्ध्यावर आले आहेत.

राज्यातील मागील दहा वर्षांतील मुद्रांक शुल्क व नोंदणी फी वसुली
वर्ष.......................दस्त संख्या....................एकूण महसूल (कोटीत)

2004-05.............15,03,763........................4,137.59
2005-06.............16,03,718........................5,307.63
2007-08..............17,36,342........................6,538.61
2008-09...............18,47,259.......................8,538.00
2009-10................17,79,318......................8,384.36
2010-11................19,87,280......................10,901.52
2011-12...............23,18,618........................13,411.26
2011-12................23,14,218.........................14,800
2012-13...............22,97,545...........................17,548
2013-14................23,30,373..........................18,666

Web Title: property sailing purchasing stop