कार्यकारी अभियंत्यासह लिपीकावर निलंबनाच्या कार्यवाहीचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या नावे आरक्षित करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

हिंगोली - येथील शासकीय विश्रामगृहातील सूट दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या नावे आरक्षित करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह लिपिकावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी शनिवारी (ता. १९) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. 

सध्या परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय व्यक्तींना शासकीय विश्रामगृहाचा वापर करता येत नाही. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे व लिपिक श्री काळे यांनी सोमवार ( ता.१४ )   दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांच्या नावे व्हीआयपी सूट आरक्षित केला. याबाबतची पावती बांधकाम विभागाने विश्रामगृहाकडे पाठवली होती. त्यावरून श्री जानकर यांच्या नावे सूट आरक्षित झाला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना मंडळ अधिकारी श्री. अल्लाबक्ष यांना दिल्या होत्या त्यावरून अल्लाबक्ष यांनी अहवाल सादर केला. त्यात आचारसंहितेच्या काळात श्री. जानकर यांच्या नावे सूट आरक्षित झाल्याचे नमूद केले. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याच्या कारणावरून कार्यकारी अभियंता श्री देशपांडे व लिपिक श्री काळे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव श्री खेडेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा परभणी जिल्हाधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा हिंगोली चे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात राजकीय व्यक्तींच्या नावे सूट आरक्षित करणे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Proposal for Suspension Action on the Clerk and Executive Engineer