समृद्धी मार्गासाठी बळजबरीचे भूसंपादन हाणून पाडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

औरंगाबाद - समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून जबरदस्तीने भूमी संपादन केले जात आहे. बागायती, फळबागा असलेली सुपीक जमीन या मार्गात जात असल्याने शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. नवीन मार्गासाठी जमीन संपादित करण्याऐवजी पूर्वीच्या दोन मार्गांचेच रुंदीकरण करावे. समृद्धी मार्गासाठी सोन्यासारखी जमीन घेऊन शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करू नका यासाठी शुक्रवारी (ता.23) मुंबई-नागपूर महामार्ग भूसंचयनविरोधी शेतकरी कृती समितीतर्फे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्‍यातील दुधड, जयपूर, शेवगा, शेंद्राबन, गंगापूर जहांगीर, कच्चीघाटी, महालपिंप्री, पळशी शहर, पोखरी, तानापूरवाडी, माळीवाडा, दौलताबाद, लासूर, हडस पिंपळगाव, टेकाळवाडी, गोकुळवाडी, टाकळी, टाकळीवाडी, गिरनेरा या गावातील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत. जमीन संपादन करण्याअगोदर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोटीस किंवा अधिकृत पूर्वसूचना न देता रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाहणीसाठी प्रवेश करत, मोजमाप घेणे, मार्किंगसाठी खांब आणून टाकणे, शेतकऱ्यांशी बोलताना दमदाटीची भाषा करुन त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करीत आहेत. अधिकाऱ्यांची वर्तणूक पूर्णपणे बेकायदेशीर असून शेतकऱ्यांमध्ये प्रक्षोभ निर्माण करणारी आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मागील दहा वर्षात विविध कारणे सांगून निष्फळ प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. आता 710 किलोमीटरचा सहापदरी मुंबई-नागपूर रस्ता नव्याने तयार करण्यासाठी शेकडो हेक्‍टर जमीन घेतली जात आहे. यात सुपीक जमीन, शेती उत्पादन, ओढे-नाले, भूजल स्रोत यांचे नुकसान होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी निवेदन देताना नानासाहेब पळसकर, योगेश दांडगे, गणेश गायकवाड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, विजय दिवाण, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, जयाजीराव सूर्यवंशी, डॉ. जनार्दन पिंपळे, बबन दांडगे, जिजाबाई दांडगे, शोभाबाई बनसोडे, बबनराव काकडे, बाबासाहेब काकडे, गणेश गायकवाड, शिवाजी दांडगे, संपत दांडगे, संजय दांडगे, योगेश दांडगे, बदाम शेख, कैलास पाखरे, कल्याण चौधरी, जगन्नाथ अंभोरे, राजू पळसकर, रामभाऊ दांडगे, अशोक फोके, भाऊसाहेब दांडगे, कल्याण डुगले आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Prosperity Road Foil forced land acquisition