नळाला दूषित पाणी, पाणीपुरवठा कार्यालयाला ठोकले टाळे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

सिडको एन-6 भागातील अयोध्यानगरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, आठ-आठ दिवसांचा गॅप दिला जात असल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत
असल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (ता. 12) महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले.

औरंगाबाद - सिडको एन-6 भागातील अयोध्यानगरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून, आठ-आठ दिवसांचा गॅप दिला जात असल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत
असल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (ता. 12) महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकले.आठ दिवसांत उपाययोजना करण्याचे लेखी आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काही महिन्यांपासून कोलमडले आहे. सिडको भागातील अयोध्यानगरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. आले तर अत्यंत कमी दाबाने येते. अनेक भागात दूषित पाणी येते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनातर्फे दखल घेतली जात नसल्याने महिलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेच्या एन-7 येथील पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मारली. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या महिलांनी अधिकाऱ्यांना भेट दिल्या.

सुमारे दीड तास महिलांसह नागरिकांनी ठिय्या दिला. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पद्मे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र, महिला ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. त्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी श्री. कोकाटे यांच्याशी फोनवर चर्चा केली. काही ठिकाणी नवी पाइपलाइन टाकून तर काही ठिकाणी दुरुस्ती करून पाण्याची समस्या आठ दिवसांत सोडविण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली. 
 

पुन्हा रस्त्यावर उतरणार 
प्रशासनाने आठ दिवसांत पाणी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्ही दोन आठवडे वाट पाहू. त्यानंतरही कामे झाली नाही तर रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी काशीनाथ कोकाटे यांनी दिला. नगरसेविका सुरेखा खरात, रवी तांगडे, संजीवनी हत्ते, राहुल खरात, दत्ता भारती, सतीश खेडकर, सी. एल. जाधव आदींनी सहभाग नोंदविला. 
 

Web Title: Protest against Contaminated Water in AMC