पाणी द्या, किती दिवस थापा मारता...

खोंदला (ता.कळंब) ः ग्रामसभेत पाणीप्रश्‍नावर बोलताना महिला. या वेळी ग्रामसेवक दयानंद शिंदे व इतर.
खोंदला (ता.कळंब) ः ग्रामसभेत पाणीप्रश्‍नावर बोलताना महिला. या वेळी ग्रामसेवक दयानंद शिंदे व इतर.

कळंब (जि.उस्मानाबाद) ः खोंदलाच्या (ता.कळंब) ग्रमस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीप्रश्‍न चांगलाच पेटला असून, मंगळवारी (ता.20) झालेल्या ग्रामसभेत पाणीटंचाई निवारणाच्या मुद्यावरून गावकऱ्यांनी आक्रमक झाले होते. पाणी द्या, किती दिवस झाले थापा मारता, असे म्हणत नागरिकांनी ग्रामसेवक दयानंद शिंदे यांना धारेवर धरले. 

खोंदला येथे मंगळवारी सरपंच लोचना पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सभेला सुरवात होताच 'विकासाच्या गप्पा ग्रामसभेत नकोच, पहिले पाणी द्या', असे म्हणत महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदीला पाणी आले. त्यामुळे गावात असलेल्या एकमेव कूपनलिकेला थोडेफार पाणी उपलब्ध झाले. त्यावरच आजवर ग्रामस्थांची तहान भागली.

पावसाने दडी मारल्याने सध्या परिसरातील नद्या, नाले कोरडे आहेत. पावसाअभावी पंधरा दिवसांपूर्वी गावातील कूपनलिकेचे पाणी आटल्याने गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसेवक श्री. शिंदे यांनी आठ दिवसांपूर्वी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली होती; पण "शासकीय काम, कितीही महिने थांब' असा अनुभव येत असून पाणी समस्या निवारणासाठी अजूनही उपाययोजना झाली नसल्याने नागरिक टॅंकरच्या प्रतीक्षेत आहेत. टॅंकर गावात यायला पंधरा-पंधरा दिवस लागतात का, असा मुद्दा उपस्थित करीत नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. 


गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आयोजित ग्रामसभेत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 
- दयानंद शिंदे, ग्रामसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com