सामाजिक वनीकरणाने पुरली मुरूमातच झाडे 

विकास गाढवे 
गुरुवार, 12 जुलै 2018

लातूर : राज्यातील वनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सामाजिक वनीकरण विभागानेच थट्टा केल्याचे दिसत आहे. वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात काळी माती न टाकता मुरूमामध्ये वृक्ष (झाडे) पुरल्याचा प्रकार घडला आहे. लातूर - बार्शी राज्य महामार्गादरम्यान मुरूडच्या (ता. लातूर) वळण रस्त्याच्या दुतर्फा हा प्रकार उघड झाला आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वनीकरणाने केलेल्या या प्रकारामुळे मोहिमेत कुंपणच शेत खात असल्याची भावना वृक्षप्रेमींमध्ये आहे.  

पर्यावरण समतोलासाठी सरकारने राज्यात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड हाती घेतली आहे. तीन वर्षात पन्नास कोटी वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा राज्यात तेरा कोटी वृक्ष लागवड करण्यात येत असून त्यापैकी 33 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट लातूर जिल्ह्याला देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीची प्रमुख जबाबदारी वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या खांद्यावर आहे. अन्य यंत्रणांकडूनही ही जबाबदारी पार पाडण्यात येत असून या यंत्रणांचे वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीकडे लक्ष आहे. यात सामाजिक वनीकरणाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून लागवडीचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन केले आहे. यातूनच रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले. त्यात काळी माती टाकून वृक्ष लागवड होण्याची आशा असतानाच वनीकरण विभागाने खड्ड्यात रोपटे टाकून खड्ड्यातून बाहेर काढलेला मुरूम पुन्हा त्यात टाकत मुरूमातच रोपटी पुरण्यास सुरवात केली आहे. यामुळे काही दिवसातच या रोपट्यांचे होत्याचे नव्हते होणार असल्याच्या प्रतिक्रिया वृक्षप्रेमी नागरिकांनी व्यक्त केल्या.

मुरूमामध्ये पुरलेल्या रोपट्यांची छायाचित्र सध्या सोशल मिडियावरून व्हायरल झाली असून सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्याची लख्तरे वेशीला टांगली जात आहेत. मागील वर्षीही वनीकरण विभागाने अशाच पद्धतीने लातूर - मुरूड रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. त्यापैकी किती वृक्ष जगली, हा संशोधनाचा विषय आहे.

अधिकारी झाले निरूत्तर
मुरूमातच वृक्ष पुरल्याच्या प्रकाराबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर - बार्शी रस्त्यावरील मुरूड वळण रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरणाकडूनच वृक्ष लागवड केल्याचे सांगितले. मुरूमामध्ये रोपटी पुरल्याची छायाचित्र त्यांना पाठवण्यात आली. ती त्यांनी पाहिली. मात्र, त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. 
 
Web Title: public forestation department sowed trees in rocky patch