लोकसहभागातून कडवंचीत जलक्रांती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

सलग तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जालना जिल्ह्याने यंदा पावसाची सरासरी ओलांडली. दमदार पावसामुळे नदी-नाले-तुडुंब भरून वाहिले. बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. कडवंची (ता. जालना) ग्रामस्थांनी तब्बल ४५० शेततळी व लोकसहभागातून केलेले पंधरा किलोमीटर नाला खोलीकरणच्या मदतीने मदतीने बाराशे एकर क्षेत्रावर उत्तम पद्धतीने द्राक्ष बागांचे व्यवस्थापन केले आहे. जलसंधारणाच्या या पॅटर्नमुळे कडवंची गावाने राज्यात आपली द्राक्षबाग व शेततळ्यांचे गाव, अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

येथील लहान व मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनी मिळून तब्बल ४५० शेततळी खोदली आहेत. यातील २५० शेततळी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, सामुदायिक शेततळी या योजनांमधून पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित दोनशे शेततळी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदली आहे. गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्याकडे दोन शेततळी असून, पैकी एका शेतळ्याची पाणी साठवण क्षमता तब्बल अडीच कोटी लिटर एवढी आहे.

महत्त्वाचे म्हणजे इंडो जर्मन पाणलोट विकास क्षेत्रांतर्गत काही वर्षांपूर्वी जलसंधारणाची कामे झाल्यामुळे कडवंची गावाला जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला. ३५ लाखांच्या लोकवर्गणीतून पंधरा कि.मी. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे कडवंचीत महाजलक्रांती घडली आहे. पंधरा किलोमीटरचा नाला पाण्याने इंच-इंच भरलेला आहे. परिणामी शिवारातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्ण क्षमतेने भरलेली शेततळी, नाला खोलीकरणात अडविलेले पाणी, तुडुंब भरलेल्या विहिरी यामुळे गावाला आणखी दोन वर्षे पुरले एवढे पाणी उपलब्ध आहे.

जलयुक्त शिवार अभियानातून जालना जिल्ह्यात झालेल्या कामामुळे सिंचन क्षेत्रासह जमिनीची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. लोकसहभाग हे जलयुक्त शिवारचे यश असून, अनेक गावांत लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. अनेक गावांना खोलीकरणाच्या कामासाठी शासकीय पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- दशरथ तांभाळे , सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान, जालना

Web Title: public participation jalakranti in kadavanci