`राष्ट्रपती` सूटमध्ये `चपराशी`ही थांबेना!

हरी तुगावकर
शुक्रवार, 12 जुलै 2019

-  शासकीय विश्रामगृहात `द प्रेसिडेंट ऑफ इंडिया` या नावाने स्वतंत्र राष्ट्रपती सूट राखीव आहे. पण या सूटची अवस्था बत्तर झाली आहे.

-  अशीच अवस्था या विश्रामगृहातील इतर सूटची झाली आहे.

-  त्यामुळे येथे उतरणाऱया `गेस्ट`चा एक प्रकारे कोंडमाराच होत आहे.

लातूर : शासकीय विश्रामगृहात `द प्रेसिडेंट ऑफ इंडिया` या नावाने स्वतंत्र राष्ट्रपती सूट राखीव आहे. पण या सूटची अवस्था बत्तर झाली आहे. अशीच अवस्था या विश्रामगृहातील इतर सूटची झाली आहे. त्यामुळे येथे उतरणाऱया `गेस्ट`चा एक प्रकारे कोंडमाराच होत आहे. या विश्रामगृहाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे या विभागाचे अभियंते नेमके करतात तरी काय? असा प्रश्न पडत आहे.

राष्ट्रपती सूटची दुरवस्था
या विश्रामगृहात `द प्रेसिडेंट ऑफ इंडिया` या नावाने स्वतंत्र राष्ट्रपती सूट राखीव आहेत. या सूटमध्ये रेडकार्पेट पडलेले आहे. मात्र विश्रामगृहातील इतर सूटपेक्षा या राष्ट्रपती सूटची अवस्था वाईट झाली आहे. फॉलसिलिंग तुटलेले, काचा फुटलेल्या, फर्निचरची दुरवस्था झाली आहे. या सूटमध्ये एखादा व्यक्ती पाचमिनीटही उभारू शकत नाही अशी अवस्था झाली आहे. इतर सूटमध्येही अशीच अवस्था आहे.

गडाच्या नावाची  बदनामी
या जुन्या विश्रामगृहात असलेल्या सूटला गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहे. त्यात शिवनेरी, सिंहगड, रायगड, पन्हाळगड, जंजिरा, विशालगड, उदयगिरी अशी नावे देण्यात आली आहेत. त्या नावांना साजेल असे हे सूट असणे आवश्यक आहे. पण आतमधील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एक प्रकारे या गडकिल्ल्याच्या नावाची बदनामीच करीत आहे.

तीन महिन्यातून बेडशीटची धुलाई
या विश्रामगृहात टीव्ही गायब आहेत. बाथरूमधील तुट्ट्याची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या सोफ्यांना वीटा लावून त्याचा वापर केला जात आहे. काही सूटमध्ये बेड आहेत. त्यावर बेडशीट आणि पिलोकव्हर आहेत. पण तीन महिन्यातून एकदा या बेडशीट आणि पिलोकव्हर धुतले जात आहेत. त्यामुळे सूटमध्ये गेल्यानंतर दुर्गंधी येत आहे. अशा बेडवरच आलेल्या पाहुण्यांना रहावे लागत आहे.

नेत्यांचे शहर, अभियंते सुस्त
दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी राज्यमंत्री अमित देशमुख अशा नेत्यांचे हे शहर आहे. राजकीयदृष्ट्या हे शहर महत्वाचे आहे. अनेक विभागीय कार्यालये आहेत. राजकीय नेत्यांना नवीन विश्रामगृहात उतरवले जाते तर अधिकारी, अभियंते, विचारवंतांना मात्र हे सूट दिले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते सूस्त झाल्याने विश्रामगृहाचा दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

विशेष पथकाने धुतले टॉयलेट

माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर सध्या लातूर दौऱयावर आहेत. त्यांना विशेष संरक्षण पथक आहे. या पथकातील जवान सध्या याच विश्रामगृहातील एका सूटमध्ये उतरले आहेत. या सूटमधील टॉयलेटमध्ये आळ्या झाल्या होत्या. या जवानांनी शुक्रवारी स्वतः हे टॉयलेट स्वच्छ करून त्याचा वापर केला आहे. पण बांधकाम विभागाचे एकही अभियंता तिकडे फिरकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public works department is lazy in latur