मिलिंद एकबोटेंना न्यायालयात काळे फासण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये ऍट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटित गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी अटक केलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची म्हणजे 21 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, एकबोटेंना न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर काळे फासण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये ऍट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटित गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकबोटे यांचा जामीन सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी (ता. 14 ) त्यांचा जामीन फेटाळला. त्यानुसार शिवाजीनगर येथील निवासस्थानातून एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांना 19 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आता या कोठडीत 21 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
 
गुन्ह्याच्या वेळी वापरत असलेला मोबाईल एकबोटे तपासासाठी देत नाहीत. हरवला असल्याचे सांगत आहे. मात्र, तपास केला असता 11 जानेवारीपर्यंत हा मोबाईल वापरण्यात येत होता. त्याद्वारे एकबोटे यांनी अनेकांशी संपर्क साधल्याचे सिद्ध झाले आहे. या मोबाईलबाबत तपास करण्यासाठी, तसेच मोबाईलवरून गुन्ह्याबाबत एसएमएस आणि व्हॉट्‌सअप केले आहे का, घटनेच्या वेळी ते पेरणे फाटा येथील एका हॉटेलमध्ये होते. त्या वेळी त्यांच्यासोबत 4 ते 5 तरुण होते. त्याबाबत ते माहिती देत नाहीत. याबाबत तपास करणे आवश्‍यक आहे. तसेच, पेरणेफाटा येथील हॉटेलमध्ये थांबले होते. त्या वेळी त्यांनी त्यांची बाजू मांडणारी पत्रके प्रसिद्ध केली होती. ही पत्रके दोन तरुणांनी बाहेरून संगणकावरून टाइप करून आणली होती. त्या वेळी त्यांनी काही आक्षेपार्ह लिखाण केले आहे का, याबाबत शोध घेण्यासाठी ते दोन तरुण कोण आहेत. याचा तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्यांना कोठडी सुनाविण्यात आली होती.

Web Title: Pune news Milnid Ekbote police custody in Koregaon Bhime riot case