कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती : उमरग्यात प्रतिबंधात्मक उपायासाठी पोलिस-पालिका कर्मचारी रस्त्यावर! 

vinamask.jpg
vinamask.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात कोरोना बाधितांच्या  रुग्ण संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडून महिना झाला. अलीकडच्या महिनाभरात रूग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता मात्र दिवाळीतील अलोट गर्दी आणि राज्य, परराज्यातून नागरिकांची झालेली आवक-जावक त्यात थंडी अशा कारणाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. 

गेल्या चार-पाच दिवसापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी प्रभावी उपाययोजनांचा राबविण्याच्या सूचना आधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 

कोरोनाचा संसर्ग कमी होईल याचा अंदाज फोल ठरत आहे. राज्यातील मोठ्या शहरातील रुग्णसंख्या पाहता तशीच अवस्था आपल्याकडेही होऊ शकते यासाठी प्रशासनाने पुन्हा मास्क न वापरणाऱ्या लोकावर दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. सोमवारी (ता.२३) सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे चौकात पोलिस आणि पालिकेचे कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून डबल, तिबल सीट जाणारे व विना मास्क फिरणाऱ्या लोकावर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेकांना या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. दरम्यान कारवाई होत असल्याचे चित्र पाहून कांही दुचाकीचालक खिशातील रूमाल व मास्क घाईगडबडीने तोंडाला लावत असल्याचे चित्र दिसून आले. तर कांही जण अलीकडूनच पळ काढत होते. या कारवाई दरम्यान कांही स्थानिक व ओळखीच्या लोकांना सवलत दिली जात असल्याचे चित्र दिसत होते. मोहिमेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या संख्या वाढवली तर आणखी प्रभाव पडू शकतो.

विनामास्क पायी फिरणाऱ्यांना मात्र सुट!
प्रशासनाने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा विचार करुन नियमांचे बंधन घालून बाजारपेठेतील दुकानांना सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत परवानगी दिली आहे मात्र बाजारपेठेत होणारी गर्दी, सामाजिक अंतराचे हरवलेले भान याचे चित्र कोरोनाला निमंत्रण देणारे आहे. कांही व्यापारी मास्कही वापरत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांमध्येही सुरक्षिततेचे ज्ञान असूनही अज्ञानासारखे वागत स्वतःहुन संसर्ग ओढावून घेण्याचा प्रकार घडत आहे. दरम्यान दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्यांना व्यक्तीला कायद्याचा नियम लावला जात आहे. रस्त्याने, बाजारपेठेत पायी फिरणारे बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नसतो, त्यांना सूट आहे का ? अशी चर्चा नागरिकात होत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com