औरंगाबादमध्ये शुद्ध पाण्यासाठी 12 वेळा प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नाथसागरातील पाणी हिरवे झाल्यामुळे महापालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, तब्बल 12 वेळा प्रक्रिया केल्यानंतर शहरात नळाला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. सहा) नळाला शुद्ध पाणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

औरंगाबाद - नाथसागरातील पाणी हिरवे झाल्यामुळे महापालिकेला पाणी शुद्धीकरणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, तब्बल 12 वेळा प्रक्रिया केल्यानंतर शहरात नळाला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. सहा) नळाला शुद्ध पाणी आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागरिकांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान, नाशिकसह इतर ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे नाथसागर काठोकाठ भरला आहे. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्‍न मिटला आहे असे वाटत असतानाच विविध तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातील पाणी हिरवे झाल्याचा प्रकार समोर आला. हिरवे पाणी पंपाद्वारे उपसा केल्यानंतर पाणी फारोळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात आले; मात्र रात्रीपासून हिरव्या पाण्याचा उपसा वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही व त्यावर नेहमीप्रमाणेच प्रक्रिया करण्यात आली.

परिणामी, शहरात नळाला पिवळे पाणी आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नगरसेवकांनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले. दुसरीकडे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी जायकवाडी येथे ठाण मांडून माहिती घेतली. त्यानंतर पाणी शुद्धीकरणासाठी केमिकलचे डोस वाढविण्यात आले. त्यामुळेदेखील पाणी पिवळे दिसत आहे. नागरिकांना पाणी उकळून प्यावे. काहीच त्रास होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडीतून पाणी उपसा केल्यानंतर नियमितपणे सहा वेळा प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते; मात्र धरणातील पाणी हिरवे झाल्याने त्रुटींसह, केमिकल आणि पाणी शुद्धीकरणाच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता शुद्ध पाणी मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pure water supply in Aurangabad