हिंगोलीला पुन्हा धक्का; मुंबईहून आलेला आखणी एक पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

 जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वती खबरदारी घेत असलेल्या जिल्हावासीयांची मात्र, मुंबईहून परत आलेल्यांनी चिंता वाढविली आहे. बहुतांश नागरिक कोरोना संशयित निघत आहेत. आठवडाभरात तर याची संख्या पंन्नासच्या वर पोचली. मंगळवारी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यात पुन्हा बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे.

हिंगोली : मुंबई येथून परत आलेल्या नागरिकांनी जिल्हावासीयांना चिंतेत टाकले आहे. मुंबईहून परत आलेल्या पुन्हा एका ३१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल बुधवारी रात्री साडेनऊ वाजता प्राप्त झाला. तर औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारा एसआरपीएफचा जवान ठणठणीत बरा झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण कोरोनामुक्त होत होत आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होईल असे वाटत असतानाच मुंबईहून परत आलेल्यांनी चिंता वाढविली आहे. मागील आठवड्यापासून मुंबईहून परत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा हिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

मंगळवारी चार कोरोनाबाधित रुग्ण 

 त्यातील बहुतांश नागरिक कोरोना संशयित निघत आहेत. आठवडाभरात तर याची संख्या पंन्नासच्या वर पोचली. यात दररोज वाढ होत आहे. मंगळवारी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यात पुन्हा बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण १६५ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. 

७४ रुग्ण उपचार घेताहेत

त्यापैकी ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यात कळमनुरी येथील कोरोना केअरसेंटरमध्ये आठ, सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत १५, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या दहा रुग्णांचा समावेश आहे.

४८३ संशयित रुग्ण भरती 

आतापर्यंत जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड व कोरोना केअर सेंटरमध्ये दोन हजार ९१ कोरोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ७१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एक हजार ६०१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४८३ संशयित भरती आहेत. 

२८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस संशयित वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उपचार घेत असलेल्या  ४८३ जणांपैकी २८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे या अहवालाकडेही लक्ष लागले आहे.

येथे क्लिक करा - ...अन्यथा शेतकरी करणार ‘मै भी गुन्हेगार’ आंदोलन

आयसोलेशन वार्डात दहा जणांवर उपचार

हिंगोलीतील आयसोलेशन वार्डात कोरोनाबाधित दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये औंढा चार, भिरडा एक, सुरजखेडा एक, सामुदाय आरोग्य अधिकारी, पहेणी दोन, माझोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

हिंगोली येथील एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यातील काही जवानांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. यातील सर्व जवान कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेणारा शेवटचा एक जवानाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Push Hingoli again; The plan from Mumbai is a positive one Hingoli news