‘क्वॉरन्टाईन’ रुग्णांची माहिती मोबाईलमध्ये

शशिकांत धानोरकर
सोमवार, 30 मार्च 2020

तामशाच्या भुमिपुत्राने विकसित केले ‘कोरोना विरोधी app’ ः पनवेल, नवीमुंबई, ठाणे महानगरपालिकांकडून केला जातोय वापर

तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथील भूमिपुत्र असलेले तरुण उद्योजक विकास भगवानराव औटे यांनी मित्रासोबत कोरोना व्हायरस विरोधीलढ्यामध्ये उपयुक्त ठरणारे मोबाईल app विकसित केले असून याचा वापर पनवेल, नवी मुंबई, ठाणेसह इतर महानगरपालिकांमध्ये कोरोना वायरस विरोधी लढ्यामध्ये फायद्याचा ठरत आहे.

पाळत ठेवणे महानगरपालिकांच्या संबंधित विभागांना शक्य होणार

विकास औटे व त्याचे मित्र मोहित तोडकर यांनी ‘कोविगार्ड’ व ‘कोवीकेअर’ या नावाची दोन app विकसित केली आहेत. या विकसित app सादरीकरण पनवेल महानगरपालिकेत केल्यानंतर उपायुक्त गणेश देशमुख यांनी कोरोनाव्हायरस विरोधी लढ्यामध्ये चांगली कामगिरी करणे शक्य होत असल्याचा विश्वास बोलून दाखविला.  कोरोना व्हायरसच्या संशयित किंवा बाधितावर अचूकपणे देखरेख किंवा पाळत ठेवणे महानगरपालिकांच्या संबंधित विभागांना शक्य होणार आहे. महानगरपालिकामधील विविध सोसायट्यांना लिंक पाठवून शासन व आरोग्य विभागाशी संपर्कात ठेवले जात आहे.

सोसायट्यांना योग्य सूचना

कोरोनाचा संशयित किंवा बाधित रुग्णाच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला, कुटुंबीयांना, सोसायट्यांना योग्य सूचना  करता येत आहे. बाधित किंवा संशयित हा निवासस्थानाबाहेर पडल्यास त्याची तात्काळ सूचना महानगरपालिकामधील आरोग्य विभागाला या जीपीएस चिपद्वारे अलर्ट म्हणून होत आहे. त्यानुसार महानगरपालिका किंवा संबंधित विभाग ताबडतोब पावले उचलून कारवाई करीत आहेत. याच्या मदतीने महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा ज्या भागात दिल्या जात आहेत त्यांची माहिती सोसायटीच्या प्रतिनिधींना पाठविली जात आहे.

 

लढा यशस्वीरित्या जिंकण्याचे प्रयत्न
अनेक महानगरपालिकांनी कोविगार्ड व कोविकेअर या दोन्हीना डाऊनलोड करून त्याद्वारे कोरोनाव्हायरस विरोधी लढा यशस्वीरित्या जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विकास औटे यांनी तामसा गावाचे नाव कोरोना वायरस विरोधी लढ्यामध्ये राज्यपातळीवर केल्याबद्दल स्थानिकांनी त्याचे व मित्राचे अभिनंदन केले.

 

हेही वाचा -  नांदेड शहरावर ड्रोनचे लक्ष, १६६ जणांविरुद्ध गुन्हे- डीवायएसपी फस्के

नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल महानगरपालिकांनी याचा वापर सुरू केला आहे. आता कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि अन्य महानगरपालिकादेखील याचा वापर करणार आहेत. याद्वारे, नागरिकांच्या आरोग्याची आकडेवारी मिळवणे खूप उपयुक्त ठरत आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून ही माहिती मिळू शकते. अलग ठेवलेले नागरिकही याद्वारे सहज संवाद साधू शकतात. आवश्यक असल्यास रुग्णालयांमध्ये भरती करत असताना देखील याची मोठी मदत होईल कारण या अ‍ॅपमध्ये ऑनलाईन वैयक्तिक चॅटची सुविधा देखील आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine Patient Information in Mobile, nanded news