पंचतारांकीत शिक्षण हवे कशाला कुलगुरूंचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

लातूर :"जे शिक्षण झाडाखाली बसून किंवा साध्या ठिकाणी घेता येते ते शिक्षण पंचतारांकीत वातावरणात घेण्याचा आग्रह कशाला? खरंतर अशा ठिकाणी वातानुकूलित यंत्रणेपासून अनेक सुविधा असतात; पण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतेच असे नाही आणि विद्यार्थीही 'आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या', असा आग्रह धरत नाहीत", अशा शब्दांत बदलत्या शिक्षण पद्धतीबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी टीका केली.

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लातूरमधील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या वेंकी चॅरिटेबल ट्रस्टचे आणि संस्थेच्या लक्ष्यवेध उपक्रमाचे उद्‌घाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच आजच्या शिक्षणातील चुकीच्या पद्धतीला 'लक्ष्य' केले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तमिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील, स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लगार सचिन इटकर, संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.

डॉ. विद्यासागर म्हणाले, "शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला हवे. पण ते होत नाही. त्यांनी शिकवले नाही तरी चालेल, असे मुलांना वाटते. अशाने ध्येय साध्य करता येत नाही. आम्हाला हे शिकवाच, असा आग्रह आपण धरायला हवा. तरच अपेक्षित यश मिळविता येते. आपण अभियंता, डॉक्टर किंवा सनदी अधिकारी व्हायचे, इतकाच विचार करतो. करीअरसाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. त्याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी आपल्यातील क्षमतांचा विकास कसा करता येईल, याचा विचार करा. संवाद कौशल्ये, भाषेवरील प्रभूत्व, लेखन कला विकसित करा.

आनंद पाटील म्हणाले, "आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, हे माहिती हवे. त्यासाठी आधी लक्ष्य ठरवावे लागेल. जिल्हाधिकारी व्हायचे, हे माझे सुरवातीला लक्ष्य होते. पण ते कसे होता येते हे मला माहिती नव्हते. पण मी धडपड केली आणि मग मला दिशा सापडली. त्यामुळे धडपड महत्वाची आहे. चोविसाव्या वर्षी जिल्हाधिकारी म्हणून माझी नियूक्ती झाली. त्यावेळी तमिळनाडूमधील सर्वात तरुण जिल्हाधिकारी म्हणून माझ्याकडे पाहीले जायचे."

इटकर म्हणाले, "आहे त्यात समाधानी राहायची वृत्तीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे आपण प्रयत्नांत कमी पडतो. प्रयत्न केले तरच आयुष्य बदलता येते. हे कायम लक्षात ठेवा."

Web Title: The question of the Vice-Chancellor of the five-star teaching