रब्बीत शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे 

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

0- पंचेचाळीस हजार हेक्टरवर हरभरा पेरणी
0- रब्बी हंगाम; ३८ टक्के हेक्टरवर पेरणी
0- रब्बीत क्षेत्र वाढविण्याचे नियोजन
0- वापशाअभावी रब्बी पेरणीला विलंब  

नांदेड : जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरण्यांनी वेग घेतला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिल्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ११७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या सोबतच ज्वारी, गहू व करडइ आदी रब्बी पेरणीचे प्रमाण ३८ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 

जिल्ह्यात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बीचे पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा तीन पट वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली होती. यंदाच्या तुफान पावसामुळे जमिनी लवकर वाफशावर आल्या नाहीत. यामुळे रब्बी पेरणीला विलंब होत आहे. जिल्हा प्रशासनानेही यंदा जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राध्यान्य दिले आहे.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हरभरा - ४५ हजार ११७, गहू - दोन हजार ४६४, रब्बी ज्वारी - दोन हजार ६०२, रब्बी मका - ६४२, करडई - ४७४, सुर्यफुल २५ हेक्टर. यानुसार एकूण एक लाख ३६ हजार ७१२ सर्वसाधारण हेक्टरच्या तुलनेत आजपर्यंत ५१ हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीचे हे प्रमाण ३८ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

रब्बीत क्षेत्र वाढविण्याचे नियोजन

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे साडे सहा लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना कांही अंशी उत्पादन मिळविण्यासाठी रब्बी हंगामाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढविणे शक्य आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जलयुक्त शिबीराच्या कामामुळे विहीरींच्या कामामुळे विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा उपलब्ध आहे. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा गहू, करडई या रब्बी पिकांची तसेच उन्हाळी ज्वारी व उन्हाळी भुईमुग या पिकांची पेरणी करावी.
अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabbi farmers' tendency towards this crop