‘या’ जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग

File photo
File photo

नांदेड : थंडीची चाहुल लागताच जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला गती आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यात सर्वाधिक एक लाख १३ हजार २२९ हेक्टरवर हरभरा, तर १२ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाची पेरणी पाच हजार हेक्टवर झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९७.८४ टक्क्यांनुसार एक लाख ३३ हजार ७६५ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदा परतीच्या झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पेरणीला विलंब झाला होता. जमिनीतील ओलावा कमी होण्यासाठी अधिक काळ गेल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कामे करता येत नव्हती. परिणामी पेरणीला वेळ लागला होता. दोन आठवड्यांपूर्वी केवळ ३८ टक्क्यांवर असलेली पेरणी सध्या ९७ टक्क्यांवर पोचली आहे. यंदा शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा पेरणीकडे अधिक भर दिला आहे.

हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी
जिल्ह्यात रब्बीचे एक लाख ३६ हजार ७१२ सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यापैकी जिल्ह्यात ९७.८४ टक्क्यांनुसार एक लाख ३३ हजार ७६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक एक लाख १३ हजार २२९ हेक्टरवर हरभरा, १२ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी, पाच हजार १७६ हेक्टरवर गहू, ८३६ हेक्टरवर रब्बी मका, ७९९ हेक्टरवर करडई, ५९ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे.

तीन लाख हेक्टरचे नियोजन
जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे प्रकल्प भरले आहेत. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने विहिरी तसेच कूपनलिकांना पाणी आले आहे. यामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यंदा रब्बीसाठी पेरणीचे क्षेत्र तीनपट करण्याचे निर्देश दिले होते.

कृषी विभागाने केलेले नियोजन
यामुळे कृषी विभागाने तीन लाख हेक्टरवर पेरणीचे वाढीव नियोजन केले आहे. यात हरभरा दोन लाख सहा हजार ८५६ हेक्टर, गहू चाळीस हजार ३८६, रब्बी ज्वारी ४१ हजार ४३८, मका पाच हजार ९३८, करडई एक हजार २८१, असे एकूण तीन लाख हेक्टरवर पेरणी होइल असे नियोजन केले आहे.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
हरभरा ः एक लाख ३३ हजार ७६५, गहू ः पाच हजार १७६, रब्बी ज्वारी ः १२ हजार, रब्बी मका ः ८३६, करडई ः ७९९, सूर्यफुल ५९. एकूण एक लाख ३३ हजार ७६५ हेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com