दोन वर्षांच्या मुलीसह चौघांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

लाडगाव (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता. 17) व बुधवारी (ता.18) दोनवर्षीय चिमुकलीसह इतर चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडल्या. तथापि, करमाड येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्‍यात कुठेच लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्चून उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही.

करमाड (जि.औरंगाबाद) : लाडगाव (ता. औरंगाबाद) येथे मंगळवारी (ता. 17) व बुधवारी (ता.18) दोनवर्षीय चिमुकलीसह इतर चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडल्या. तथापि, करमाड येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्‍यात कुठेच लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्चून उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही.

गेल्या काही महिन्यांपासून शेंद्रा एमआयडीसीसह परिसरातील मोठ्या गावांत महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे व जनावरे आणून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांत या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत रविवारी (ता.15) "सकाळ'ने याबाबत जनजागृती करीत या विषयाबाबत विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. सुभाष साळवे (वय 48), शैलेश बागल (19) व दोन वर्षांची स्वराली इथ्थर यांच्यासह शेतात मजुरीवर काम करणाऱ्या दोन महिलांना (नाव मिळू शकले नाही, सर्व रा. लाडगाव) यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला.
यातील श्री. साळवे यांना गावातच बुधवारी (ता. 18), तर श्री. बागल यांना शेतावर जात असताना दुचाकीचा पाठलाग करीत पायाला चावा घेतला, स्वराली हिला घरासमोरच, तर नाव न समजू शकलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी शेतात काम करताना मंगळवारी (ता. 17) दोन वेगवेगळ्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी हा चावा घेतला.

औरंगाबाद तालुक्‍याचा सर्वाधिक भाग हा शहराच्या चारही दिशांनी व्यापलेला आहे. यात तालुक्‍याचा ग्रामीण भाग मोडतो. शहरात असलेले मोकाट कुत्रे व जनावरे महानगरपालिकेच्या वतीने नेऊन सोडण्याचा सिलसिला वर्षभर या भागात सुरूच असतो. मोठ्या संख्येने बेवारस कुत्रे एकत्रित हिंडत असल्याने येथील ग्रामस्थांत नेहमीच भीतीचे वातावरण असते. दरम्यान, प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नाही. ही बेवारस कुत्री झुंडीने फिरत असल्याने आबालवृद्धांत नेहमीच दहशतीचे वातावरण असते. दुचाकीच्या पाठीमागे लागणे, लहान मुलांवर अचानक हल्ला करणे यामुळे शाळेत मुले पाठवणाऱ्या पालकांत भीतीचे वातावरण असते. या कुत्र्यांकडून नेहमीच चावा घेण्याचे प्रकार घडत असतात. मात्र, अशा घटना घडल्यास आवश्‍यक असलेल्या "रेबीज' लसीचा गावस्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी नेहमीच वानवा असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खासगी रुग्णालयांतून मोठा खर्च करून उपचार घ्यावे लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabies Dog Bites Five Peoples