फडणवीस, ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच : अजित पवार

चंद्रकांत तारु
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. 19) केली.

पैठण (जि.औरंगाबाद ) : पूरग्रस्तांच्या मदतीला न जाता शिवसेना-भाजप नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्यावर भर दिला असून, एकीकडे फडणवीस, तर दुसरीकडे ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. 19) केली.

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ बालानगर (ता. पैठण) येथे करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ज्येष्ठ नेते कदीर मौलाना, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, भास्करराव राऊत, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल जाधव, रेवनाथ कर्डीले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पवार म्हणाले, ""भाजप शिवसेनेचे सरकार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्जमाफी करून, त्यापुढील रक्कम भरण्यास सांगत आहे. अशी कर्जमाफी हे लबाडाचं निमंत्रण असून, खरीप पीक विम्यासाठी रब्बी पीकविमा कंपनीवर मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या पिकांचीही माहिती नाही. बॅंका, कंपन्या बंद होत असून, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. उद्योगधंदेही बंद पडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील सत्ता परिवर्तन, मन परिवर्तनासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे.''

शिवाजी महाराजांचा सरकारकडून अपमान : मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक करण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, एकही खडी तेथे अजून टाकली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेलाही शिवाजी महाराजांचे नाव दिले. त्या योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. छत्रपतींच्या नावाने राजकारण करून हे सरकार जनतेला फसवित आहे. शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. नोकरीतली सध्याची मेगा भरती नसून, ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांची मेगा भरती आहे.''

बये दार उघड' म्हणण्याची वेळ : डॉ. कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ""पैठण तालुक्‍यात विकासाचे गंभीर प्रश्‍न आहेत. या भागातील आमदारांनी काय केले, हा प्रश्‍नच आहे. त्यांना जाब विचारावा. विकासाच्या प्रश्नावर संतांच्या भूमीत "बये दार उघड' म्हणण्याची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Race for chief minister post between Fadanvis And Thackeray