शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही -  राधाकृष्ण विखे पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

. विखे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली. दुष्काळाबाबत शासनाला गांभीर्य राहिलेले नाही. दुष्काळाची दाहकता व परिस्‍थिती जाणून घेण्यासाठी आपण दौरे करत आहे. शासनाकडून वेळोवेळी बदलत चाललेल्‍या निकषामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या प्रश्नावर आगामी विधानसभेच्‍या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

हिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. 14) केला.

औंढा नागनाथ तालुक्‍यातील पिंपळदरी येथील श्रीरंग रिठ्ठे यांच्‍या शेतात भेट देवून श्री. विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी खासदार ॲड. राजीव सातव, आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, ॲड गयबाराव नाईक, बापूराव घोंगडे, सरपंच अनिता फलटणकर, रमेश जाधव, दत्ता कदम, नगरसेवक सुमेध मुळे यांच्‍यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. यावेळी त्‍यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला. शेतकऱ्यांनी दुष्काळाची दाहकता त्‍यांच्‍यासमोर मांडली.

यावेळी श्री. विखे पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली. दुष्काळाबाबत शासनाला गांभीर्य राहिलेले नाही. दुष्काळाची दाहकता व परिस्‍थिती जाणून घेण्यासाठी आपण दौरे करत आहे. शासनाकडून वेळोवेळी बदलत चाललेल्‍या निकषामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. या प्रश्नावर आगामी विधानसभेच्‍या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले.

आपला दौरा स्‍टंट असल्‍याचे म्‍हणणाऱ्या मंत्र्यांनी स्‍वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करण्याचा धंदा बंद करावा. आता जनताच त्‍यांना फिरू देणार नाही. शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सरकारमध्ये नसल्‍यामुळेच सत्ताधारी मंत्रीच शहरी भागात फिरत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. या सरकारला धक्‍का दिल्‍याशिवाय शेतकऱ्यांचे हित साधले जाणार नाही असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. पैसेवारी कमी असतानाही वसमत व औंढा तालुका दुष्काळी यादीतून वगळल्‍याने त्‍यांनी आश्चर्य व्यक्‍त केले.

यावेळी श्री. विखे पाटील यांनी सर्वेक्षण कसे केले असा सवाल कृषी अधिकाऱ्यांना विचारला. त्‍यावर अधिकाऱ्यांन सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण झाल्‍याचे सांगितले. या उत्तरावर श्री. विखे पाटील चांगलेच भडकले. सर्वेक्षण योग्‍य झाले की नाही हे पहायला शेतकऱ्यांना सॅटेलाईटवर पाठवणार का असा सवाल करत त्‍यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. यावेळी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी पिक आणेवारीबाबत समाधानकारक उत्तरे देवू शकली नाही. त्‍यामुळे श्री. विखे पाटील यांनी थेट विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांच्‍याशी संपर्क साधून माहिती देण्याच्‍या सूचना दिल्‍या.

Web Title: Radhakrishna Vikhe Patil criticized government for farmers loss