सावकारासह तीन भावांच्या घरांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लातूर - कासार शिरसी (ता. निलंगा, जि. लातूर) येथील एका सावकारासह त्याच्या तीन भावांच्या घरावर सहकार विभागाने मंगळवारी (ता. सात) छापे टाकले. छाप्यात खरेदीखत, कोरे चेक, बॉंड यांसह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे विभागाच्या हाती लागली असून त्याची छाननी करण्यात येत आहे. सहकार विभागाच्या चार पथकांनी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी अडीच, अशी सलग साडेचार तास ही कारवाई केली. बेकायदा सावकारीविरुद्धचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा छापा आहे.

जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे यांनी या कारवाईस दुजोरा दिला आहे.
कासार शिरसी येथील लहू माणिक माने हा अनेक वर्षांपासून सावकारी करतो. सहकार विभागाचा सावकारी व्यवसायाचा परवानाही त्याच्याकडे आहे. या स्थितीत परवान्याबाबत असलेल्या अटी व नियमांची चौकट ओलांडून तो व त्याचे भाऊ बेकायदा सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे आली होती. तक्रारदार हा माने याच्या बेकायदा सावकारी व्यवसायाचा बळी ठरला होता. यामुळे सहकारमंत्र्यांनी सक्त कारवाईचे आदेश जिल्हा उपनिबंधक वांगे यांना दिले होते. त्यानुसार श्री. वांगे यांनी प्राथमिक चौकशी केली व चार पथकांची स्थापना करून मंगळवारी माने व त्याच्या तीनही भावांच्या घरावर छापे टाकले. या छाप्यात एका भावाच्या घरी काहीच सापडले नसल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. माने व त्याच्या दोन भावांकडे बेकायदा सावकारीशी निगडित आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. यात कोरे स्टॅंप पेपर (बॉंड), कोरे धनादेश (चेक), खरेदीखत, कोऱ्या वचनचिठ्ठ्या (प्रॉमिसरी नोट) आदींसह अनेक कागदपत्रांचा समावेश आहे. पथकाला सापडलेल्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सहकार विभागाच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पथकात एस. एम. केदार, एन. एस. शेख, एस. पी. कांबळे, के. एस. कांबळे, एम. ए. कदीर, बी. एच. शिंदे, राजकन्या हिंगले, ए. पी. कदम, जे. जी. जाधव, व्ही. एन. बोयने, आर. बी. शिंदे, आर. जी. तडळवकर, डी. आर. सरतापे, एस. डी. काटे, व्ही. एम. कुमारे व वैशाली गणगे यांचा समावेश होता.

छाननीनंतर पोलिसांत गुन्हा
छाप्यात सापडलेली सर्व कागदपत्रे पथकांनी पंचनामा करून जप्त केली आहेत. छाननीनंतर माने व त्याच्या भावाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होणार आहे. माने याच्याकडे परवाना असला तरी प्राथमिक चौकशीत त्याने या परवान्याचे उल्लंघन केल्याचे दिसत असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: raid on home