उदगीरहून सोयाबीन रेल्वेबोगीने गुजरातला रवाना, पंधरा वर्षांची मागणी अखेर पूर्ण

युवराज धोतरे
Tuesday, 9 February 2021

रेल्वेनी वाहतूक होणार असल्याने अनेक खरेदीदार व्यापारी उदगीरात येणार व त्यांच्यात स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

उदगीर (जि.लातूर) : उदगीर बाजार बाजारपेठेतील शेतकऱ्यांचा मालाची रेल्वेबोगीची वाहतूक सुरू करावी ही मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून असलेली अखेर पूर्ण झाली आहे. आयटीसी कंपनीने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले २६०३ मेट्रिक टन सोयाबीन सोमवारी (ता.आठ) रेल्वे बोगीने गुजरातला रवाना करण्यात आले आहे. उदगीर रेल्वेस्थानकावर दिवसेंदिवस अधिकाधिक सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यातच शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली रेल्वे बोगी मालवाहतूक सुरू करण्यात आल्याने या भागातील व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वेनी वाहतूक होणार असल्याने अनेक खरेदीदार व्यापारी उदगीरात येणार व त्यांच्यात स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील बाजारात आयटीसी कंपनी शेतकऱ्यांचे सोयाबीन थेट खरेदी करते. बाजारभावापेक्षा शंभर ते दोनशे रुपये वाढीव दराने शेतकऱ्यांना भाव देते. वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने या कंपनीच्या खरेदीवर अनेक वेळा मर्यादा येत होत्या.

या भागातील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने आयटीसी या कंपनीस त्यांचे सोयाबीन गुजरातला नेण्यासाठी शेचाळीस डब्बे असलेली बोगी उपलब्ध करून दिली. उदगीरच्या एमआयडीसी येथील गोदामातून सचिन अॅग्रो फुड्सचे उद्योजक संदीप हुडे यांनी रेल्वे स्थानकप्रमुख श्री.जोशी यांच्या सहकार्याने शेचाळीस डब्ब्यात एकूण दोन हजार ६०२ मेट्रिक टन सोयाबीन लोड करून सोमवारी गुजरातला रवाना केले.

या रेल्वेबोगीच्या वाहतुकीमुळे अनेक ट्रक मालकांना, बसचालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळाले. शिवाय आयटीसी कंपनीच्या मालाला वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्याने थेट शेतकऱ्यांचा माल खरेदी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. लवकरच नवीन खरेदी चालू करण्यात येणार असल्याचे या वेळी आयटीसी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

रेल्वे मंत्र्यांचे ट्वीट..

कृषी अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी रेल्वेने आपले योगदान देत महाराष्ट्रातील उदगीरहुन गुजरातच्या गांधीनगरसाठी सोयाबीनची लोडिंग सुरू केली आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करून सर्वना शुभेच्छा दिल्या आहेत. उदगीरच्या व्यापाऱ्यांनी ही त्यांचे धन्यवाद मानले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Boggi Depart With Soybean From Udgir To Gujrat Latur Updates