रेल्वे लुटीचा ‘तांत्रिक’ फंडा

Railway-Loot
Railway-Loot

औरंगाबाद - आऊटर सिग्नलचे वायर तोडून रेल्वेला स्थानकापासून काही अंतरावरच थांबवून लूट करण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ दिसून येत आहे. अशा प्रकारच्या रेल्वे लुटीच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वायर तोडल्यामुळे सिग्नल मिळत नाही. म्हणून स्थानकात येणारी रेल्वे काही अंतरावरच थांबते. सिग्नलबाबतचे असे ज्ञान अवगत असलेल्या काही टोळ्या रेल्वेत लूट करीत आहेत. रेल्वेकडे तूर्तास याबाबत काही योजना दिसून येत नाही.

दिवसा सुरक्षारक्षकांच्या अभावामुळे धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांचे फावते. परंतु, रात्री एक्‍स्प्रेस रेल्वेमध्ये सुरक्षारक्षक तैनात असतात. 
परिणामी दिवसांपेक्षा रात्री रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांवर आळा बसू लागला होता.यावर कडी करीत चोरट्यांनी आऊटर सिग्नलचे वायर तोडण्याची नवीन शक्कल वापरात आणली आहे. 

या टोळ्यांनी रेल्वेच्या तांत्रिक यंत्रणेलाच आव्हान दिले. या टोळ्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या काही कंत्राटी कामगारांचा समावेश असल्याचे पोलिसांनी पकडलेल्या टोळीतील सदस्यांवरून स्पष्ट होते. रेल्वे विभागात कधी काळी कंत्राटी कामगार असलेल्यांना तसेच तेथे मिळेल ती कामे करणाऱ्यांना हाताशी धरून या टोळ्या सिग्नल यंत्रणेचे तंत्र जाणून घेतात आहेत. त्यातून परळी, नाशिक-मनमाड आदी ठिकाणी रेल्वेत लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. 

सूत्रांनी सांगितले, की नाशिक, मनमाड, नांदेड, सातारा, निफाड, जळगाव, परभणी, कुर्डुवाडी यासह आंध्रप्रदेशातील अनेक रेल्वेंवर दरोड्याचे प्रकार घडले. यातील बहुतांश जण नाशिक भागातील आहेत. 

मध्यंतरी पकडलेल्या टोळीतील संशयित रोहित राळेभात हा कल्याणच्या रेल्वे ठेकेदाराकडे ठाकुर्ली भागातील कंत्राटी कामगार होता. सिग्नल जोडणी करणे, सिग्नल न मिळावे म्हणून कोणती वायर तोडावी, अशा बाबी तो जाणून होता.

असा असतो पूर्वनियोजित कट
  आठ ते दहा जणांची टोळी असते.
  रात्रीच्या वेळीच लूट केली जाते.
  आऊटर सिग्नलचे वायर तोडून रेल्वे थांबविली जाते.
  खिडकीजवळील महिलांचे दागिने हिसकावून किंवा रेल्वेत घुसून लूट केली जाते.
  आऊट सिग्नल जवळच ठेवलेल्या वाहनांतून पळ काढला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com