रेल्वेप्रश्नी केवळ बैठकांचा फार्स नको

शिवचरण वावळे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नांदेड   ः  मागील पंधरा वर्षापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून वर्षातून एकदा खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. एका दिवसापूर्तीच उठाठेव केली जाते. खासदारांचा आदर, सन्मान राखला जातो मात्र खासदारांनी सुचविलेल्या उपाययोजना तसेच प्रवासी संघटनेची खासदारांनी सादर केलेल्या मागण्यांवर काहीच विचार होत नाही. रेल्वे विभागातील आधिकाऱ्यांकडून मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जातो. रेल्वे विकासाचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर अशा बैठकीला अर्थच नाही, अशा शब्दात खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

नांदेड   ः  मागील पंधरा वर्षापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून वर्षातून एकदा खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. एका दिवसापूर्तीच उठाठेव केली जाते. खासदारांचा आदर, सन्मान राखला जातो मात्र खासदारांनी सुचविलेल्या उपाययोजना तसेच प्रवासी संघटनेची खासदारांनी सादर केलेल्या मागण्यांवर काहीच विचार होत नाही. रेल्वे विभागातील आधिकाऱ्यांकडून मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केला जातो. रेल्वे विकासाचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर अशा बैठकीला अर्थच नाही, अशा शब्दात खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे बुधवारी (ता. १३) दुपारी नांदेड विभागाच्या कार्यालयात खासदारांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, परभणीचे खासदार संजय जाधव, खंडवाचे खासदार नंदकुमार चव्हाण, दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक गजानन माल्ला, नांदेडचे विभागीय व्यवस्थापक त्रिकाल यज्ञ राभा यांची उपस्थिती होती. या वेळी सर्वच खासदारांनी मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी कणखर भूमिका मांडताना या पुढे मराठवाड्याच्या रेल्वे विकासात भेदभाव झाल्यास सर्व पक्ष, संघटना मिळून मराठवाड्यात रेल्वे रोको आंदोलन करु असा इशाराच दिला.

खासदारांनी केल्या मागण्या 

राजधानी एक्सप्रेस ही गाडी मनमाड एेवजी नांदेड येथून सोडण्यात यावी. अजिंठा एक्सप्रेसच्या वेळेत बदल करु नये, नांदेड ते पुणे स्वतंत्र गाडी सुरु करावी, अकोला - हिंगोली - मुंबई स्वतंत्र गाडी करावी, अकोला ते पूर्णा ब्रॉडगेज, परभणी, पूर्णा रेल्वे प्लॉटफार्मवर चोरीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफच्या जवानांची नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व प्रवाशांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मागण्यांचे निवेदन स्विकारले

तत्पूर्वी सर्व खासदारांनी विविध रेल्वे प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन स्विकारले. त्यानंतर रेल्वे विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना रेल्वे विकासात मराठवाड्याच्या वाट्याला सापत्निक वागणूक का दिली जात आहे. रेल्वे विभागाची बैठक खासदारांच्या जेवणापुरतीच बोलावली जाते का? असे असेल तर या पुढे कुठल्याही खासदारांना या बैठकीस बोलावू नका. मराठवाड्यातील दुहेरी मार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा. अन्यथा मराठवाड्यातून एकही रेल्वे पुढे सरकू देणार नाही, असा इशारा दिला.

कोण काय म्हणाले..?..

राजधानी एक्सप्रेस मनमाडएेवजी नांदेडहून सोडण्यात यावी. देवगिरी, नंदीग्राम एक्सप्रेसच्या कोचमध्ये वाढ करण्यात यावी. निजामाबाद - तिरुपती एक्सप्रेस नांदेडहून सोडण्यात यावी. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना मराठवाड्याच्या कॅंलेडर प्रमाणेच सुटी देण्यात यावी. नांदेड - गंगानगर एक्सप्रेस शेगावला थांबविण्यात यावी.
- प्रताप पाटील चिखलीकर, खासदार, नांदेड.

रेल्वे विभागाकडून खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. परंतु त्यातुन काहीच निष्पन्न होत नाही. परंतु यापुढे असे झाल्यास रेल्वे विभागातून एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी जनआंदोलन उभारले जाईल.
- हेमंत पाटील, खासदार, हिंगोली.

रेल्वे विकासाच्या बाबतीत मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली आहे. परंतु यापुढे असे होऊ देणार नाही. गेल्या १५ वर्षापासून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही. यासाठी पक्ष संघटन बाजूला ठेवून मराठवाडा रेल्वे विकासासाठी सर्वांनी मिळून लढा देण्याची खरी गरज आहे.
- इम्तियाज जलील, खासदार, औरंगाबाद.
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railways do not want to be the only meeting force