शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

वालवडमध्ये सर्वांत कमी पाऊस
भूम तालुक्‍यातील वालवड आणि अंबी महसूल मंडळात पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कमी पाऊस वालवड मंडळात केवळ ३२ मिलिमीटर झाला आहे. अंबी मंडळात ४७ मिलिमीटर पाऊस झाला असून इतर तिन्ही मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

उस्मानाबाद - जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांत पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै सुरू झाला तरी आतापर्यंत केवळ १२ टक्केच खरिपाची पेरणी झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

दुष्काळामुळे गेल्या वर्षी शेतकरी मेटाकुटीला आला. त्यात यंदाही पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे संकटाचे ढग दुरावलेले नाहीत. जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी अनेक महसूल मंडळांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. परंडा तालुक्‍यात सर्वात कमी म्हणजे सरासरी केवळ ६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्‍यातील अनाळा (१०७), परंडा (८०) वगळता इतर तिन्ही मंडळांत अगदीच कमी पाऊस आहे. सर्वात कमी सोनारी मंडळात केवळ ३७, तर आसू मंडळात ३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जवळा महसूल मंडळात ५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

वाशी तालुक्‍यात चांगला पाऊस झाला असून सर्वात कमी पाऊस तेरखेडा मंडळात ९० मिलिमीटर झाला आहे. 

कळंब तालुक्‍यातील इटकूर मंडळात जिल्ह्यात सर्वाधिक २०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. येरमाळा ५३, मोहा आणि गोविंदपूर मंडळात प्रत्येकी ७७, लोहाऱ्यात ७६, माकणीत ६३, जेवळी मंडळात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्‍यात नारंगवाडी येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला असून उर्वरित सर्वच मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

तुळजापूर तालुक्‍यात मंगरूळ ४३ तर इटकळ मंडळात ६७ मिलिमीटर पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. उर्वरित मंडळात बऱ्यापैकी पाऊस आहे. उस्मानाबाद तालुक्‍यातील पाडोळी ३६ तर केशेगाव मंडळात ७४ मिलिमीटर पाऊस असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Agriculture Farmer