पावसाची भुरभुर; मोठ्या सरी दूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नांदेड - आठ मंडळांत अतिवृष्टी
नांदेड - किनवट, माहूर तालुक्‍यांत काल रात्री चांगला पाऊस झाला. दोन्ही तालुक्‍यांतील आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, मुदखेड, नायगाव, उमरी तालुक्‍यांतही चांगला पाऊस झाला. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २६.८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, माहूर तालुक्‍यात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस आज दिवसभर कायम होता.

औरंगाबाद - मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले, तरी पावसाचा फारसा जोर नसल्याचे चित्र मंगळवारी (ता. ३०) पाहायला मिळाले. बहुतांश जिल्ह्यांत भुरभूर पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी रिमझिम झाली. त्यानंतर सायंकाळी रिपरिप सुरू होती. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले.

परभणीत भिजपाऊस
परभणी - परभणी शहरासह जिल्हाभरात मागील चार दिवसांपासून सुरू असलेला भिजपाऊस आजही कायम राहिला. गत २४ तासांत ३.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

हिंगोली जिल्हाभरात पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणामुळे दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. गत २४ तासांत ११.३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्‍यातील सालेगाव परिसरातील लहान ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे पुलाचे सिमेंटचे काही पाइप वाहून गेले. डोंगरगाव परिसरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला प्रथमच पाणी आल्याचे पाहावयास मिळाले.

लातूरला गंभीर स्थिती
पावसाचे दोन महिने सरले तरी लातूर जिल्ह्यात अद्याप एकदाही मोठा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून काही भागांत भुरभूर सुरू आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही भागांत आजही भुरभूर होती. जिल्ह्यात सरासरी आकडेवारी दररोज वाढत असताना अपेक्षित पाऊस मात्र पडताना दिसत नाही. याचा मोठा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अद्याप गंभीर आहे.

उस्मानाबादेत संततधार
उस्मानाबाद - फारसा जोर नसला तरी जिल्ह्याच्या काही भागांत काल सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. आजही दिवसभर रिपरिप सुरू होती. त्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आतुरता आहेच.

जालना जिल्ह्यात पावसाची भुरभूर
जालना - शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तिसऱ्या दिवशीही आज पावसाची भुरभूर सुरू होती. आज सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत २.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासून आतापर्यंत सरासरी ३१०.७८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ २१७.०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बीडमध्ये सूर्यदर्शन नाही
बीड - जिल्ह्यात काल व आज ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागांत आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोवळ्या पिकांना आधार मिळाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी असून आतापर्यंत १३१.१ मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १९.६७ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Agriculture Water