पीक काढणीलाच पावसाचा दगा 

प्रकाश ढमाले
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पिंपळगाव रेणुकाई : मका, सोयाबीनला फटका, अनेकांच्या शेतांत साचले पाणी 

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -   परिसराला ऐन पिकांच्या काढणीच्या वेळीच पावसाने दगा दिला आहे. येथे शनिवारी (ता. पाच) झालेल्या वादळी पावसाने मका, सोयाबीनसह चाराही भिजल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर अनेक ठिकाणी मका पडल्या, तर कपाशीही जमिनीवर टेकल्या आहेत. 

यंदा सुरवातीपासूनच परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे पिकांची उगवण क्षमता चांगली होऊन पिकेही जोमात आली होती. मात्र सतत जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात पावसाने चांगली उघडीप दिल्यामुळे शेतीकामे वेगात सुरू होती. सध्या पिके काढणीच्या वेळातच पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. शनिवारी भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाईसह कोठाकोळी, हिसोडा, जळगाव सपकाळ, दहिगाव, आडगाव भोंबे, करजगाव, वरूड, देहेड, रेलगाव, सावंगी अवघडराव, पारध, शेलूद, लेहा, मोहळाई परिसरात पावसाने दोन तास हजेरी लावली. या पावसामुळे शेतात पडलेला मका, बाजरीचा चारा पूर्णपणे भिजला आहे. मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन या पिकांची जवळपास मजुरांची टंचाई असताना शेतकऱ्यांनी चाळीस टक्के सुगी करून टाकली आहे. 

कपाशी धोक्‍यात 
आधीच सततच्या पावसाने उडीद, मूग, चवळी हे पीक साठ टक्के खराब झाले आहे, तर सोयाबीन हे पीक पन्नास टक्के वाया जाण्याच्या स्थितीत आहे. या पावसाने कपाशीची बोंडे फुटण्याआधीच सडताना दिसत आहेत. अशा स्थितीत कपाशीही हातातून जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

मजुरांच्या तुटवड्याने शेतकरी त्रस्त 
यंदा मका, सोयाबीन, ज्वारी सर्व पिके एकदाच काढणीला आली आहेत. शिवाय मिरची तोडणी सुरू आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशात मजूरही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. शिवाय मजुरीचे दरही तीनपटीने वाढल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत दिसून येत आहे. सध्या महिला मजुरांसाठी साडेतीनशे तर पुरुष मजुरांसाठी चारशे रुपये रोजंदारी सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to crops