पावसाने वळल्या कापसाच्या वाती 

बाबासाहेब गोंटे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

अंबड (जि.जालना) - पिकांना फुटले कोंब, शेतकरी हवालदिल 

अंबड (जि.जालना)- सततच्या पावसाने कापसाच्या जणू वाती वळल्या आहेत. ऐन उत्पन्नाच्या दिवसांत पिकांचे बेहाल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अंबड तालुक्‍यातील आलमगाव, हस्तपोखरीसह अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. 

अंबड तालुक्‍यात सतत जोरदार पावसाने दिवसरात्र हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात पिकांत पाण्याचे पाट साचले आहे. यामुळे खरिपाबरोबरच रब्बीला फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाच्या वाती झाल्या तर दुसरीकडे मका, सोयाबीन, बाजरी या पिकांना जागेवरच कोंब फुटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अखेर निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महसूल व कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याची पावसाने दुरवस्था केली. कापूस फुटताच वेचणीअगोदर वाती होत आहेत. हातात चार पैसे मिळण्याऐवजी खर्चही वसूल होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आर्थिक समीकरण बिघडले आहे. 
- प्रकाश मुंजाळ 
शेतकरी, मार्डी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to crops