कष्टकऱ्यांच्या स्वप्नांची सतत राखरांगोळी 

प्रकाश ढमाले
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसामुळे विदारक चित्र 

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - परिसरात सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कशाबशा तगलेल्या पिकांचा पावसाने घास घेतला आहे. कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची सतत राखरांगोळी होत आहे. 

परिसरात गेल्या अठरा दिवसांपासून दररोज पावसाने मोठी हजेरी लावली आहे. यामुळे मका, सोयाबीन, कपाशी ही पिके वाया जात आहेत. सोयाबीन तर आधीच गेली असून मका थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. परिसरात शुक्रवारी (ता. एक) मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. शनिवारीही पावसाने हजेरी लावली. या पावसाने नदी, नाले दुतर्फा भरून वाहिले. शेतामधून दोन फुटांपर्यंत पाणी वाहिले. या वाहणाऱ्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांनी चारशे ते पाचशे रुपये रोजंदारी देऊन मका वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तो धुळीस मिळाला असून मका नदी, नाल्यांमध्ये वाहिली. शेतात जमा केलेली मका नाले, नदीमध्ये वाहताना दिसून आली. नदी, नाल्याशेजारील शेती वाहिल्याने शेती निकामी झाली आहे. शेतांनाही नाल्याचे स्वरूप आले आले आहे. तलावांचे पाणी एक किलोमीटरपर्यंत साठले असून संपादित नसलेल्या जमिनीही तलावाच्या पाण्याखाली गेल्या आहेत. आता जवळपास नव्वद टक्के मका वाया गेली. ठिकठिकाणी मका जनावरांच्या खायच्या कामाची राहिली आहे. थोड्याशा उत्पन्नाचे स्वप्न पाहिले होते, तेही सततच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to crops