esakal | पावसाची अति... पिकांची झाली माती 
sakal

बोलून बातमी शोधा

पाडळी शिवारात पाण्यात बुडालेले पीक.

रोषणगाव मंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाही. त्यामुळे या भागात पिकेच काय तर शेतातील मातीही वाहून गेली आहे. शेतात साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध, दुथडी भरून वाहत असलेले नदी, नाले व बंद पडलेले रस्ते या भागात झालेल्या जलप्रलयाची साक्ष देतात.

पावसाची अति... पिकांची झाली माती 

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) -  तालुक्यातील बदनापूर व रोषणगाव मंडळांत पुन्हा पावसाचा कहर बरसला. सोमवारी (ता. १३) या दोन्ही मंडळांत अनुक्रमे ७७ व ७६ मिलिमीटर म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली. अर्थात मंगळवारी (ता. १४) दुपारी या दोन्ही मंडळांत मुसळधार पाऊस कोसळला. रोषणगाव मंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाही. त्यामुळे या भागात पिकेच काय तर शेतातील मातीही वाहून गेली आहे. शेतात साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध, दुथडी भरून वाहत असलेले नदी, नाले व बंद पडलेले रस्ते या भागात झालेल्या जलप्रलयाची साक्ष देतात.

अवघ्या राज्यात कोरोनाची धास्ती असताना बदनापूर तालुक्यातील रोषणगाव, बदनापूर आणि शेलगाव मंडळातील शेतकऱ्यांना आता कोरोनापेक्षा आता पावसाची अधिक भीती वाटत आहे. या तिन्ही मंडळांत पाऊस काही पाठ सोडायला तयार नाही. मागच्या महिन्यात रोषणगाव मंडळात ढगफुटी झाली होती. तेव्हा एकाच रात्रीत २०७ मिलिमीटर असा विक्रमी पाऊस झाला होता. त्यात काही ठिकाणी बियाणे उगविण्यापूर्वीच वाहून गेले तर काही ठिकाणी उगवलेल्या पात्यांना पावसाने हिरावून नेले. यानंतर या भागातील काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली होती. 

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

दरम्यान, सोमवारी रात्री बदनापूर व रोषणगाव मंडळांत पुन्हा मुसळधार पाऊस झाला. तर शेलगाव मंडळातही तब्बल ६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका रोषणगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, बाजार वाहेगाव, नानेगाव, देवगाव, कस्तुरवाडी, मांजरगाव, ढोकसाळ, सायगाव, डोंगरगाव, कुसळी, माळेगाव, कडेगाव, वरुडी, पाडळी आदी शिवारातील शेतजमिनीला बसला. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बदनापूर, रोषणगाव व शेलगाव मंडळांत कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, मूग आदी उगवलेली पिके वाहून गेली. काही ठिकाणी पिके तग धरून असली तरी अति पावसाने ती पिवळी पडत आहेत, त्यामुळे खरीप पिकांकडून शेतकऱ्यांना असलेल्या आशा आता संपल्यात जमा आहेत. 

नदी - नाल्यांना आले पूर, वाहतूकही ठप्प 

बदनापूर व रोषणगाव मंडळात अतिवृष्टीमुळे दुधना, सुकना आदी नद्यांना पूर येऊन दुधडी भरून वाहत आहेत. ओढ्या - नाल्यांनी विक्राळ रूप धारण केले. नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा 

तालुक्यातील रोषणगाव मंडळात यंदा तीनदा अतिवृष्टी झाली. त्यात बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झाला आहे. यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे केले. त्यामुळे आता पुन्हा पंचनाम्यात वेळ वाया न घालवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, शिवाय बदनापूर व शेलगाव मंडळांत पंचनामे करून मदत जाहीर करावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

रोषणगाव मंडळात सातत्याने पाऊस होत आहे. त्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीने कहर केला आहे. माझ्या १६ एकर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्चही वाया गेला. त्यामुळे प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. 
नंदकिशोर दाभाडे, 
शेतकरी, धोपटेश्वर 

(संपादन : संजय कुलकर्णी)