उन्हाळ्यात जगविलेल्या फळबागा पावसाळ्यात संकटात 

आनंद इंदानी
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

राजेवाडी शिवारातील चित्र, शेतकरी झाले हतबल 

बदनापूर (जि.जालना) - "काही खरं नाही भाऊ, उन्हाळ्यात विकतच्या टॅंकरने मोसंबीच्या बागा जगविल्या. आता अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचून मोसंब्या कुजत आहेत आणि फळगळही होत आहे. जणू निसर्गाने शेतकऱ्यांचा पिच्छाच धरला आहे... आता सरकारने तरी मदत करावी,' अशी व्यथा राजेवाडी (ता. बदनापूर) येथील वयोवृद्ध फळ बागायतदार देवचंद रामचंद गुसिंगे यांनी शनिवारी (ता. दोन) व्यक्त केली. 

राजेवाडी शिवारात पंधरा दिवसांपासून सातत्याने पावसाने ठाण मांडल्याने काढणीला आलेली खरीप पिके पुरती गेली, तर मोसंबीच्या बागांतदेखील पाणी साचल्याने मोसंबीच्या पात्या पाण्यात जाऊन फळ करपत आहे. शिवाय प्रचंड फळगळ होऊन मोठे नुकसान होत आहे. दुष्काळात जिवापाड जपलेल्या फळबागांचे अतिवृष्टीत होत असलेले हाल मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरत आहेत. 
बदनापूर तालुक्‍यात सबंध पावसाळ्यात पाऊस रुसला होता. अगदीच जेमतेम पाऊस झाल्याने पुन्हा दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र जवळपास पावसाळा संपला असे वाटत असतानाच मॉन्सुनोत्तर पावसाने कहर माजवला. पंधरा दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे काढणीला आलेली खरीप पिके हातची गेली. कापूस, मका पिकांना तर कोंब फुटले. तर दुसरीकडे फळबागांचेही अतोनात हाल झाले. राजेवाडी शिवारात मोजक्‍या शेतकऱ्यांकडे मोसंबीच्या बागा आहेत. त्यापैकी देवचंद गुसिंगे यांनी पाच एकर क्षेत्रात मोसंबीची बाग जोपासली आहे. त्यांच्या बागेत साधारण आठ ते दहा वर्षांची जवळपास 1200 मोसंबीची झाडे आहेत. तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. विहिरी व बोअरने तळ गाठल्याने त्यांना उन्हाळ्यात पदरमोड करून टॅंकरने पाणी देत बागा जगविण्याची धडपड करावी लागली. त्यासाठी एकरी 25 हजार रुपये खर्च सहन करावा लागला. आता मोसंबीची फळे बहरात आलेली असताना अचानक आलेल्या अतिवृष्टीने त्यावर घाला घातला. मोसंबीच्या बागांतही पाणी तुंबले आहे. त्यामुळे देवचंद यांच्यासह इतर बागायतदारांना वीजपंप लावून पाइपलाइनने बागेतील पाणी नदीत सोडावे लागत आहे. मात्र सातत्याने बागेत पाणी तुंबल्याने बहरात असलेल्या मोसंबीची प्रत घसरत आहे. मोसंबीच्या मुळ्या व पाते पाण्यात राहून कुजत आहेत. त्यामुळे काही झाडांवरील फळांना बुरशी लागली आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. अशी फळे फेकून दिल्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नाही. 

उन्हाळ्यात विकतचे पाणी आणून फळबाग जगवली. आता अतिवृष्टीमुळे बागेत पाणी तुंबल्याने मोसंबीचे नुकसान होत आहे. निसर्गाने जणू शेतकऱ्यांचा पिच्छा धरला आहे. आम्ही मोसंबीच्या पिकासाठी कर्ज घेतले आहे. अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पीककर्ज कसे फेडावे, ही चिंता सतावत आहे. शासनाने तातडीने शेतपिकांसह फळपिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी व पीककर्ज माफ करावे, 
- देवचंद गुसिंगे 
शेतकरी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain badly affected to orchard