पाऊस पडतोय... रिमझिम, जोरदारही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भोकरदन तालुक्‍यातील दोन नद्यांना पूर, धामनासह पद्मावती प्रकल्प ओव्हरफ्लो 

जालना - जिल्ह्यात बुधवारी (ता.18) काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे भोकरदन तालुक्‍यातील पद्मा व रायघोळ नद्या दुथडी भरू वाहिल्या आहेत. तर धामना व पद्मावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे पारध व धामना मध्यम प्रकल्पाखालील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जालना शहरामध्ये बुधवारी (ता. 18) पावसाने हजेरी लावली. शहरातील मोतीबाग परिसरात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. तर अंबड चौफुली परिसरासह नूतन वसाहत परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, शहरातील इतर भागांत पावसाचा जोर नव्हता. दरम्यान, हा पाऊस संपूर्ण शहरात झाला नाही. 
दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात भोकरदन तालुक्‍यातील वालसावंगी, पारध, हसनाबाद, पिंपळगाव रेणुकाई, केदारखेडा आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भोकरदन तालुक्‍यातून वाहणाऱ्या पद्मा व रायघोळ या दोन नद्या दुथडी भरून वाहिल्या. तर धामना व पद्मावती मध्यम प्रकल्प पुन्हा ओव्हरफ्लो झाला. तसेच घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, अंबडसह तालुक्‍यातील रोहिलागड, अंकुशनगर, शहागड आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला, तर जिल्ह्यातील पावसाची तूट भरू येणार मदत होईल. 

दक्षतेचा इशारा 
धामना मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यात रायघोळ नदी क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी रायघोळ नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धामना मध्यम प्रकल्पाखालील सर्व गावांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आला आहे. तसेच पारध गावात ग्रामपंचायतीकडून गावात दवंडीही देण्यात आली. 

पिकांना बसणार फटका 
वालसावंगी परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने पिकांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विशेष करून मिरची पिकाला मुसळधार पावसामुळे मिरची तोडणी थांबली आहे. शिवाय पावसामुळे मिरचीचा दर्जा घसरून कवडीमोल भाव मिळण्याची शक्‍यता आहे. याशिवाय अनेक शेतांमध्ये कपाशी पिकात पाणी तुंबल्याने पीक कुजण्याची शक्‍यता आहे. शिवाय मका, सोयाबीन पिकालाही फटका बसू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district