जालना जिल्ह्यात वीज पडून मजूर ठार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी (ता. १३) पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पेरणीसह लागवडीला वेग येणार आहे.  दरम्यान, पिठोरी सिरसगाव (ता. अंबड) येथील शेतात सायंकाळी वीज पडून एक मजूर ठार झाला.

जालना - जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी (ता. १३) पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पेरणीसह लागवडीला वेग येणार आहे.  दरम्यान, पिठोरी सिरसगाव (ता. अंबड) येथील शेतात सायंकाळी वीज पडून एक मजूर ठार झाला.

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव (ता. अंबड) येथील शेतात सायंकाळी वीज पडून सुनील कुंडलिक मस्के (वय ४०) हा मजूर ठार झाला. भालगाव येथील पाच-सहा मजूर राजू अवधे यांच्या शेतात कुंपणाचे काम करीत होते. त्यावेळी पाऊस आल्याने मजुरांनी झाडाचा आश्रय घेतला. अंगावर वीज पडल्याने सुनील कुंडलिक मस्के मृत्युमुखी पडला. घटनेबाबत ग्रामस्थांनी शहागड पोलिस चौकीत माहिती दिली.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

तीर्थपुरी परिसरात शनिवारी (ता. १३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाऊस झाला असून, शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. या भागात गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची लागवड केली. त्यामुळे या शेतकऱ्यांना या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. या पावसामुळे शेतकरी विविध बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता आहे. आकाशात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : जालन्यात कोरोनाच्या विळख्यात चौदा जण

वडीगोद्री  परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. परिसरात आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामाला या पावसामुळे वेग येणार आहे. मोसंबी, ऊस आदी पिकांना याचा फायदा होईल. वडीगोद्रीप्रमाणे अंतरवाली सराटी, नालेवाडी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

शहागड  परिसरात शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर सूर्यप्रकाश, तर सायंकाळी सहानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. रात्री सात वाजेनंतर पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या. परिसरातील वीजपुरवठाही विस्कळित झाला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district