रोषणगाव मंडळात रेकॉर्डब्रेक पाऊस 

आनंद इंदानी
Friday, 26 June 2020

बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात मोठ्या अपेक्षेने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर गुरुवारी (ता. २५) पहाटे निष्ठुरपणे बरसलेल्या पावसाने पाणी फेरले. या मंडळात झालेल्या ढगफुटीत अवघ्या दोन तासांत २०७ मिलिमीटर पावसाचा विक्रम नोंदविला गेला.

बदनापूर (जि.जालना) - तालुक्यातील रोषणगाव मंडळात मोठ्या अपेक्षेने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर गुरुवारी (ता. २५) पहाटे निष्ठुरपणे बरसलेल्या पावसाने पाणी फेरले. या मंडळात झालेल्या ढगफुटीत अवघ्या दोन तासांत २०७ मिलिमीटर पावसाचा विक्रम नोंदविला गेला.

या अतिवृष्टीत पेरलेली बियाणे व खते वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय पुन्हा दुबार पेरणीसाठी पैसा उभा करण्याचे नवे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. या भागात अनेक शेतांत साचलेले पाण्याचे तलाव, वाहून गेलेले नवतीचे पीक, पाण्यात खंगाळून गेलेली जमीन, फुटलेले बांध, घरांची झालेली पडझड गुरुवारी झालेल्या निसर्गाच्या कोपाची साक्ष देतात. शासनाने तातडीने आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जालना जिल्ह्यातील रोषणगावसह मंडळातील बाजार वाहेगाव, नानेगाव, वाकुळणी, सायगाव, डोंगरगाव, बुटेगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, मांजरगाव, ढोकसाळ, कुसळी, देवगाव, माळेगाव आदी गावांत गुरुवारी (ता. २५) रात्री सव्वातीन ते पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत अक्षरशः ढगफुटी झाली. तालुक्यात दोन तासांत २०७ मिलिमीटर पाऊस पडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. यापूर्वीही दहा-आठ दिवसांपूर्वी रोषणगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे आणि खते वाहून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. 

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पेरणीचा पाऊस लांबल्याने वेळेत पेरणी होत नव्हती. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. रोषणगाव मंडळात तर इतर मंडळांच्या तुलनेत कमीच पाऊस होत असल्याने या मंडळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही जास्त आहे. मात्र यंदा तालुक्यात मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत पावसाचे वेळेवर आगमन झाले. त्या जोरावर रोषणगाव मंडळात सरकी, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी पिकांची पेरणी पूर्ण झाली. मात्र या मंडळात एकाच आठवड्यात दोनदा अतिवृष्टी झाली. गुरुवारी पहाटे तर ढगफुटी होऊन पेरलेली बियाणे, टाकलेली खते वाहून गेली. कर्ज, उधार-उसनवारी करून शेतकऱ्यांनी कशीबशी काळ्या आईची ओटी भरली होती. मात्र निसर्गाने अवघ्या रात्रीतून होत्याचे नव्हते केले. आता पुन्हा दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडला असून पुन्हा बियाणे आणि खते आणण्यासाठी पैसा कसा उभारावा ही विवंचना शेतकऱ्यांसमोर आहे. 

माती, बंधारे वाहून गेले, पूल खचला 

रोषणगाव मंडळात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतांत पाण्याचे तळे साचले आहे. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे नवतीच्या पिकांसह शेतातील माती खंगाळून वाहून गेली. त्यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच मात्र जमिनीचा पोतही खराब झाला आहे. अनेक शेतांत मातीचे भराव, बांधबंदिस्ती वाहून एका शेतातील पाणी दुसऱ्या शेतात गेले. तर धोपटेश्वर येथील नाल्याचा भराव व रस्ता फुटल्याने नाल्याचे पाणी शेतातील पिकांत शिरले. अंबडगाव, रोषणगाव, बाजार वाहेगाव येथील गावांत पाणी शिरल्याने गल्ल्या जलमय झाल्या होत्या. तुरळक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. 

नदी-नाल्यांना आला पूर 

सततच्या पावसामुळे तालुक्यातील दुधना, लहुकी नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीत या नद्यांना पूर आला आहे. दुधना, लहुकी, सुकना आणि भोरडी नद्यांसह अनेक ओढे यंदा जून महिन्यातच जलमय झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district