जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रावणसरी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

जाफराबाद तालुक्यातील पासोडी परिसरात बुधवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार श्रावणसरी बरसल्या. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले, तर शिवारातील पिके आडवी झाली आहेत. 

जालना - जाफराबाद तालुक्यातील पासोडी परिसरात बुधवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार श्रावणसरी बरसल्या. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबले, तर शिवारातील पिके आडवी झाली आहेत. 

जाफराबाद तालुक्यात वरूड बुद्रुक परिसरातील पासोडी गावात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. ‍या पावसामुळे भारज बुद्रुक गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आला होता. कमी उंचीच्‍या पुलावरून पाणी वाहण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. शेतात काम करीत असलेल्यांची शेतातून घरी परतताना मोठी तारांबळ उडाली. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता मध्यम स्वरूपात पाऊस झाला. नालेवाडी, अंतरवाली सराटी, वडीगोद्री आदी ठिकाणी शेतीच्या मशागतीचे कामे सुरू आहेत. कापूस, तूर, ऊस, मोसंबी आदी पिकांना पावसाची गरज आहे. परिसरात थोडा-थोडा पाऊस येत असल्याने पिकांना जीवदान मिळत आहे. परिसरात दमदार पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत. 

हेही वाचा : धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास साधारण एक तास जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती. दुपारी पडलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला. दरम्यान, पावसामुळे पिकांना वाढीसाठी चांगला फायदा होणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली असून, सकाळपासून मिरची तोडणी सुरू असल्याने पावसापासून तोडलेली मिरची, भरलेले मिरची पोते ताडपत्रीने झाकताना दमछाक झाली. शिवाय सायंकाळी देखील रिमझिम पाऊस सुरू होता. 

अंबड परिसरात पावसाची जोरदार हजेरी 

अंबड शहर व परिसरात बुधवारी दुपारनंतर आकाशात ढग चांगलेच भरून आले होते. सायंकाळी सहा वाजेनंतर मुसळधार पावसाने 
हजेरी लावली. रस्त्यावरून पाणी वाहत होते. नूतन वसाहतीमधील शिक्षक प्रकाश घायतडकर, प्रा. जालिंदर बटुळेसह अनेकांच्या घरात तसेच दुकान, हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्य तसेच उपाहारगृहातील खाद्यपदार्थांचे नुकसान झाले. परिसरातील शेतशिवारात, कपाशीच्या उभ्या पिकांत पाण्याचे पाट साचले आहेत. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district