लातूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पंधरा दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी (ता. 17) रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. यातूनच मंगळवारी रात्री 12.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी (ता. 18) दुसऱ्या दिवशी दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस कोसळत होता. शहरात मंगळवारी रात्रीनंतर बुधवारी दुपारी मोठा पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. पाण्यातून रस्ता काढताना तसेच रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. 

लातूर : पंधरा दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी (ता. 17) रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. यातूनच मंगळवारी रात्री 12.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी (ता. 18) दुसऱ्या दिवशी दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस कोसळत होता. शहरात मंगळवारी रात्रीनंतर बुधवारी दुपारी मोठा पाऊस झाल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. पाण्यातून रस्ता काढताना तसेच रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. 

जिल्ह्यात सुरवातीपासून टप्प्याटप्प्याने पाऊस पडत आहे. ता. 31 ऑगस्ट ते चार सप्टेंबर या काळात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतरच्या काळात रिमझिम पाऊस सुरू होता. गणेशोत्सवाच्या काळात मोठा पाऊस पडत असल्याचा अनुभव असल्याने सर्वांनीच या पावसाची प्रतीक्षा केली. मात्र, एकही मोठा पाऊस झाला नाही.

निसर्गात होणारे विविध बदल मोठ्या पावसाला पूरक असल्याचे सांगून सोशल मीडियावरही मोठ्या पावसाच्या शक्‍यता वर्तविल्या जात होत्या. वातावरणातील उकाडा तसेच आकाशातील पावसाचे ढग कायम असल्याने दिवसभरात किंवा रात्रीच्या वेळी चांगला पाऊस होण्याची आशा दररोज पल्लवित होत आहेत. यातच मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.

देवणी, उदगीर व जळकोट तालुक्‍यांतील तुरळक पाऊस सोडला तर उर्वरित नऊ तालुक्‍यांत चांगला पाऊस झाला. सर्वाधिक 24 मिलिमीटर पाऊस निलंगा तालुक्‍यात, तर सर्वांत कमी तीन मिलिमीटर पाऊस उदगीर तालुक्‍यात झाला आहे. लातूर व औसा तालुक्‍यांत बारा मिलिमीटर, जळकोट- पाच, देवणी- चार, रेणापूर- 18, अहमदपूर- 23, चाकूर- 14, तर शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात नऊ मिलिमीटर पाऊस झाला.

बुधवारीही जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. दिवसभर पाऊस कोसळत होता. पावसाने नदी व नाल्यांना पाणी आले असून, शेतकरी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in latur District