लातूर जिल्ह्यात पावसामुळे मतदानाचा खोळंबा

विकास गाढवे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

लातूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २०) रात्रीपासूनच सर्वदूर दमदार पावसाला सुरूवात झाली. सोमवारी (ता. २१) पहाटेपासून पाऊस वाढला. यामुळे सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा खोळंबा झाला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांना गळती लागल्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली.

लातूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २०) रात्रीपासूनच सर्वदूर दमदार पावसाला सुरूवात झाली. सोमवारी (ता. २१) पहाटेपासून पाऊस वाढला. यामुळे सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा खोळंबा झाला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांना गळती लागल्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली.

काही ठिकाणी पावसात अडकलेल्या मतदान प्रतिनिधींची प्रतीक्षा करावी लागली तर केंद्राला लागलेल्या गळतीचे पाणी अंगावर झेलतच मतदानाला सुरवात करावी लागली.
जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात हा पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पाणी आले आहे. कोरड्या असलेल्या प्रकल्पात पाणीसाठा वाढत असला तरी काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे. काही भागात पाण्याखाली गेल्याने पिकांची नासाडी होत आहे.

पूर्वी टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या पावसाने रविवारी रात्रीपासून संततधार सुरू केली आहे. रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी पहाटे वाढला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून अजूनही पाऊस पडत आहे. पावसामुळे सकाळी सातपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. पावसामुळे मतदारांना घराबाहेर पडता आले नाही. काही मतदारांनी मात्र, पावसात छत्री व रेनकोटचा आधार घेत मतदान केले.

काही मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता सुरू होणारी मतदान प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली. मतदान प्रतिनिधी (पोलिंग एजंट) पावसात अडकल्याने त्यांची प्रतिक्षा करावी लागली. काही ठिकाणी मतदान केंद्राला गळती लागल्याने कसरत करतच मतदान प्रक्रिया सुरू झाली. मुरूड (ता. लातूर) येथील जनता विद्यामंदीर विद्यालयातील दोन मतदान केंद्राला गळती लागल्याने अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in latur , slowdown in voting