मराठवाड्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर संततधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - महिना-दीड महिना पाठ फिरविलेल्या पावसाने मराठवाड्यात काल रात्रीपासून पुनरागमन करीत संततधार धरल्याने भेगाळलेल्या खरिपाला दिलासा मिळाला आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीत काहीसा जोर तर अन्य जिल्ह्यांत रिपरिप ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जलप्रकल्पांत साठ्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.

सुरवातीला पडलेल्या अल्प पावसावर पेरणीची कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर पावसाने सुमारे दीड महिना खंड दिला. पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेती क्षेत्रात भेगा पडल्या. पिकांची वाढ खुंटली. खरीप संकटात येण्याची भीती व्यक्त होत असताना पावसाने दिलासा दिला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल तुरळक पडणाऱ्या पावसाची आज पहाटेपासून संततधार सुरू झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नाले खळाळले. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने पावसाळी वातावरण दिसले.

जिल्ह्यातील स्थिती
लातूर - जिल्ह्यात एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सर्वच 53 महसूल मंडळांत पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. आतापर्यंत सरासरी 382.81 मिलिमीटर पाऊस झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू होती.

जालना - जिल्ह्यात बुधवारी (ता. 15) रात्रीपासून सर्वदूर रिपरिप सुरू आहे. अनेक मध्यम आणि लघू प्रकल्प कोरडे असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

बीड - जिल्ह्यात दीड महिन्यानंतर काल रात्रीपासून पुनरागमन झाले आहे. सरासरी 21.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कपाशी, तुरीला दिलासा मिळाला.

नांदेड - जिल्ह्यात हिमायतनगर, किनवट तालुक्‍यांतील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आला. सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे.

परभणी - पावसाने काल रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

हिंगोली - शहरासह जिल्हाभरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे सुमारे साडेतीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. हिंगोली येथील कयाधू नदीला पूर आला आहे.

Web Title: Rain in Marathwada