मराठवाड्यात बळिराजा धास्तावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

औरंगाबाद - सलग पाच दिवसांपासून मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरीही धास्तावला आहे. दरम्यान, मंगळवारीही ( ता. १०) मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्‍या आणि मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद शहरात सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सखल भागातील घरे आणि काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

बीडमध्येही दुपारनंतर केज, गेवराई व धारूर तालुक्‍यांत काही ठिकाणी रिमझिम, तर कुठे मध्यम पाऊस झाला. किल्लेधारूरमध्ये तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतीतील कामे ठप्प झाली, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद शहरातही दुपारी हलक्‍या सरी बरसल्या. तुळजापुरात पावसामुळे आठवडी बाजारात व्यापारी, ग्राहकांची तारांबळ उडाली. वाशी शहरात सायंकाळी सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात मात्र वातावरण ढगाळ होते. तर, नांदेडमधील वाईबाजार (ता. माहूर), जलधारा (ता. किनवट) आणि हिंगोली तालुक्‍यातील गोरेगाव येथेही हलक्‍या पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हा शिडकावा दिलासा देणारा असला, तरी या पावसामुळे रब्बी पिके, फळबागा व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

दिवसा उन्हाळा, रात्री पावसाळा 
पाच दिवसांपासून लातूरकर ‘दिवसा उन्हाळा अन्‌ रात्री पावसाळा’ अनुभवत आहेत. शुक्रवारपासून (ता. ६) जिल्ह्यात पाऊस होत असून किल्लारी, औसा, भादा, उदगीर भागांना गारपिटीचा तडाखा बसला. मंगळवारी दिवसा तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत होते; पण सायंकाळनंतर पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. निलंगा तालुका व येरोळ येथेही सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळला.

Web Title: rain marathwada farmer