मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता.११) रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

औरंगाबाद - मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता.११) रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात दिवसभर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होती. सूर्यदर्शन झाले नाही. दमदार पावसाची मात्र प्रतीक्षाच राहिली. परभणी, पूर्णा, जिंतूर, पालम तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा तर सेलू, पाथरी, मानवत तालुक्‍यांत भुरभुर होती. हिंगोली जिल्हातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास वसमत, जवळाबाजार परिसरात काहीकाळ जोरदार पाऊस झाला. नांदेड शहरासह ग्रामीण भागात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात दुपारी एक ते दीडच्या सुमारास दहा मिनिटे तर त्यानंतर तीनच्या सुमारास अर्धा ते पाऊणतास पाऊस झाला. सखल भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातील नायगाव, मुक्रमाबाद (ता.मुखेड), मुखेड व परिसरात पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाला. औरंगाबाद शहरात तुरळक पाऊस झाला. 

उस्मानाबाद - अनेक दिवसांपासून शहरापासून दुरावलेल्या पावसाने आज शहरात हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. तुळजापूर तालुक्‍यातील नळदुर्ग परिसरात हलका पाऊस झाला आहे. उस्मानाबाद तालुक्‍यातील कसबे-तडवळे, खामगाव शिवारतही पावसाने पुन्हा हजेरी लावली. भूममध्येही हलका पाऊस झाला. लोहारा तालुक्‍यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Monsoon Environment