पावसाचा 23 दिवसांपासून खंड, पिकं वाचविण्यासाठी उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लिंबोळी अर्क 5 टक्के प्रमाणे सलग 8 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्काची फवारणी घेवूनही शेंदरी बोंडअळी नियंत्रणात नाही आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

परभणी : सध्या मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडलेला आहे. तब्बल 23 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपातील हंगाम धोक्यात आला आहे. अजून काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिके वाचविण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उपाय योजना सुचविल्या आहेत.

पावसाच्या खंडकाळात कोरडवाहू पिकांचे व्यवस्थापन केल्यास पिकांवर पडणारा पाण्याचा ताण काही अंशी कमी होऊन पिक उत्पादनात होणारी घट कमी होऊ शकते, असा सल्‍ला कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे शास्‍त्रज्ञ डॉ.भगवान आसेवार व डॉ. मदन पेंडके यांनी दिला आहे.

अशा करा उपाययोजना

कापूस पिकांसाठी पाण्याचा ताण कमी करण्यासाठी  200 ग्रॅम पोटॅशियमनायट्रेट 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूसावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले, पाते गोळा करुन नष्ट करावीत. कामगंध सापळ्याचा वापर करावा. 

लिंबोळी अर्क 5 टक्के प्रमाणे सलग 8 दिवसाच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात. निंबोळी अर्काची फवारणी घेवूनही शेंदरी बोंडअळी नियंत्रणात नाही आल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

सोयाबीन : सोयाबीनचे पीक सध्या फुलोरा या अवस्थेत आहे. पाने खाणारी अळी व खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी प्रोफेनोफॉस याकिटकनाशकाची 50 टक्के प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकावर पाण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 200 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मुग : मुगावरील माव्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भूरी रोग आढळून आल्यास गंधकाची 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मका : मका पिकावरील  खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी कार्बोफ्युरान 3 टक्के 13 किलो प्रती एकर जमिनीतुन द्यावे.तूर  पिकाची आंतरमशागत करुन पिक तण विरहीत ठेवावे. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील. सर्वच पिकात कोळपणी करुन भेगा बुजवाव्यात असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.
 

Web Title: Rain Stopeed Crops is in Bad Conditions